पोलिसांचा फोकस आता मनीषा यांच्या बॅंक खात्यातील १.१० कोटींच्या रकमेवरच! जामीन अर्जावरील म्हणणे द्यायला पोलिसांनी अजूनही सरकारी वकिलांना दिली नाहीत कागदपत्रे
esakal May 21, 2025 06:45 AM

सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येला ३३ दिवस झाले. आता पोलिस गुन्ह्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवून घेत आहेत. साक्षीदार बदलले तर आपल्या तपासाला काहीच अर्थ राहणार नाही, याची खबरदारी तपास अधिकारी घेत आहेत. मंगळवारी डॉ. अश्विन आणि डॉ. शोनाली वळसंगकर यांच्यासह रुग्णालयातील अन्य चौघांचे जबाब न्यायालयात नोंदविण्यात आले. त्यात व्यस्त असल्याने तपास अधिकाऱ्यांना सरकारी पक्षास गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे द्यायला वेळच मिळाला नाही.

डॉ. शिरीष यांच्या खिशातील सुसाईड नोटमधील मजकुरात कोठेही आर्थिक त्रासाचा उल्लेख नाही किंवा त्यात मनीषा मुसळे माने यांच्यावर त्या अनुषंगाने आरोप देखील नाहीत. पण, सुरवातीला मनीषा यांच्या ई-मेलवर फोकस केलेल्या पोलिसांनी मागील १० दिवसांपासून मनीषा यांच्या बॅंक खात्यातील रकमेवर भर देत तपास सुरू केल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने रुग्णालयातील कॅशियर, चार्टर्ड अकाउंटंट आणि मनीषा यांच्या मोबाईलवर ऑनलाइन पैसे पाठविलेल्या पाच जणांचे जबाब घेतले. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना जवळपास ४५ जणांचे जबाब घेतले आहेत. त्यात बहुतेक रुग्णालयातील कर्मचारी आहेत. ज्यांचे जबाब गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाचे वाटतात, त्यांना न्यायाधीशांसमोर बोलावून त्यांची साक्ष नोंदविली जात आहे.

तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी डॉ. शिरीष यांची पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली यांना न्यायालयात बोलावले होते. त्यानंतर मंगळवारी (ता. २०) पुन्हा डॉ. अश्विन, डॉ. शोनाली यांच्यासह अन्य चौघांना बोलावून त्यांचे जबाब प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. कुंभार यांच्यासमोर नोंदविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांचा फोकस आणि तर्क...

सुरवातीला आठ कारणे देत मनीषा यांची पोलिस कोठडी मागणाऱ्या पोलिसांनी पुन्हा दहा, सात, दोन अशी कारणे देत वारंवार पोलिस व न्यायालयीन कोठडी (पोलिस कोठडीचे अधिकार राखून) घेतली. या काळात मनीषा यांनी केलेले खोटारडे व घाणेरडे आरोप कोणते, रुग्णालयात १८ एप्रिलला फाडलेल्या मूळ ई-मेलचे तुकडे जप्त करण्याची कारणे पोलिसांनी कोठडीसाठी दिली. पण, आता तो तपास पूर्णपणे मनीषा यांच्या तीन बॅंक खात्यातील एक कोटी १० लाख ३० हजार ४८० रुपयांभोवती फिरत आहे. त्यात आयकर भरताना न दाखविलेले खात्यातील ७० लाख ४३ हजार १६० रुपये आणि ८ एप्रिल २०२२ ते ७ डिसेंबर २०२४ या काळात मनीषा यांच्या खात्यात जमा झालेल्या ३९ लाख ८७ हजार ६८० रुपयांचा समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहार समजल्याने डॉ. शिरीष यांनी मनीषा यांचे अधिकार काढून घेतले आणि त्यातूनच मनीषा यांनी डॉक्टरांना बदनामीची धमकी दिली. त्यातूनच हे कृत्य घडल्याचा पोलिसांचा तर्क आहे. त्यादृष्टीने आता तपास सुरू आहे.

सरकारी पक्षाला आज कागदपत्रे अपेक्षित

मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर मागच्या आठवड्यात सरकारी पक्षाचे म्हणणे सादर होणे अपेक्षित होते, पण पोलिसांकडून त्यांना कागदपत्रे न मिळाल्याने त्यासाठी मुदतवाढ घ्यावी लागली. उद्या (ता. २१) ती मुदत संपणार असून अद्याप पोलिसांकडून मनीषा यांच्या जामीन अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी जिल्हा सरकारी वकिलांना गुन्ह्यासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे मिळालेली नाहीत. बुधवारी कागदपत्रे न मिळाल्यास म्हणणे सादर करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत घ्यावी लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.