स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : सकाळ, दुपार, सायंकाळ एकच की!! राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंत:पुरात येरझारा घालत आहेत. मधूनच कपाळावर मूठ हापटत ‘जगदंब, जगदंब’ असे पुटपुटत आहेत. मधूनच हवेतच अदृश्य तलवारीचे हात करुन मच्छर भगावत आहेत. मधूनच उघडे पडलेले एक पुस्तक वाचून ‘चुक चुक चुक’ असे हळहळत आहेत. अब आगे…
उधोजीराजे : (गर्रकन मान वळवत) कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? आईग्गंऽऽ… (मान गेली कामातून! पण हे तीनदा करायचे, असे त्यांनी कुठल्यातरी टीव्ही मालिकेत पाहिले आहे. चालायचेच.)
संजयाजी फर्जंद : (लगबगीने येऊन) मुजरा महाराज!! मान धरली जणू?
उधोजीराजे : (संतापून) खामोश! आमची मान धरणारी अवलाद अजून पैदा व्हायची आहे!!
संजयाजी फर्जंद : (खुलासा करत) तसं नव्हे, मान अवघडली आहे, तर बाम आणून देऊ का, असं विचारायचं होतं…
उधोजीराजे : (भिवई वक्र करीत) मोठे लेखक झालात! आता आम्हाला शिकवा अक्कल..!!
संजयाजी फर्जंद : (तोबा तोबा करत) छे, छे! कसला लेखक नि संपादक, महाराज! आम्ही तुमचे कदीम सेवक!! तुम्ही आमचे पोशिंदे!! तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत…
उधोजीराजे : (थोडं खुशालून) बरं बरं!! आमच्या राज्यात काय हालहवाल आहे?
संजयाजी फर्जंद : (तीन बोटं दाखवत) पृथ्वीलोकाबद्दल सांगू की स्वर्ग की नरक?
उधोजीराजे : (छद्मीपणाने) तुम्ही हल्ली त्रिखंडाचं ज्ञान प्राप्त केलंय, असं दिसतंय!! पृथ्वीवरचा स्वर्ग, स्वर्गातला नरक, नरकातला स्वर्ग!! मग स्वर्गातला पृथ्वीलोक, नरकातला पृथ्वीलोक…बरीच प्रगती आहे तुमची!!
संजयाजी फर्जंद : (विनयानं) कशापायी असं टोचून बोलता, धनी! तुम्ही आदेश दिला तरच पुढचेही सगळे भाग लिहून काढीन!!
उधोजीराजे : (घाबरुन) नको, नको! एक नरकातला स्वर्ग पुरेसा आहे!! आम्हाला आणखी नरकयातना देऊ नका!!
संजयाजी फर्जंद : (मिशीवर ताव मारत) पहिल्या दिवशीच आख्खी एडिशन खल्लास झाली, बोला!!
उधोजीराजे : (आश्चर्यानं) काय सांगताय काय? अभिनंदन! तुम्ही बेस्टसेलर झाला आहात!!
संजयाजी फर्जंद : (हिशेब करत) माझ्या मते आणखी पंधरा-सोळा आवृत्त्या तरी काढाव्या लागतील!! वाचक सांगतात की, असं पुस्तक गेल्या दहा हजार वर्षात झालं नाही, आणि पुढल्या दहा हजार वर्षात होणार नाही!!
उधोजीराजे : (असूयेनं) ओळख ठेवा!
संजयाजी फर्जंद : (खोट्या विनम्रतेनं) कसचं कसचं!! मोठमोठाले लोक पुस्तकावर माझी स्वाक्षरी घेण्यासाठी ताटकळले होते, मी सगळ्यांना स्वाक्षऱ्या दिल्या, सेल्फी काढू दिल्या!! महाराज, हे सारं तुमच्यामुळे घडलं!! थँक्यू!!
उधोजीराजे : (भूतकाळात डोकावत) आम्हीही फोटोग्राफीची पुस्तकं काढली होती एकेकाळी…गेले ते दिवस! हल्ली मोबाइल फोनच्या क्यामेऱ्यातूनही फोटो काढत नाही फारसे!!
संजयाजी फर्जंद : (खांदे उडवत) पुस्तक लिहिणं एवढं काही अवघड नाही! तुम्हालाही जमेल!!
उधोजीराजे : (वैतागून) त्यासाठी तुमच्यासारखा नको तिथं जाऊन बसू की काय? भलतंच!!
संजयाजी फर्जंद : (खेळीमेळीने) मी सुचवतो तुम्हाला मस्त आयडिया, महाराज! मुंबईचा उन्हाळा सोसवत नाही म्हणून तुम्ही नुकतेच युरोप दौरा करुन आलात ना?
उधोजीराजे : (संशयानं) हा टोमणा आहे की प्रश्न?
संजयाजी फर्जंद : (दुर्लक्ष करत) तुम्ही प्रवासवर्णन लिहा फस्क्लास! युरोप सहलीची प्रवास वर्णनं जाम खपतात!! मुंबईतल्या उकाड्यापासून सुरु करा, उकाड्यातच संपवा! आपण पुस्तकाला टायटल देऊ- स्वर्गातला नरक! ओके?