बारावीत ‘पीसीएम’ घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेईई-सीईटी मध्ये कमी पर्सेंटाइल आल्यास ‘प्लॅन बी’ म्हणून कोणते कोर्सेस उपयुक्त ठरतील, ते आजच्या लेखात पाहूयात.
इंजिनिअरिंगमधील इतर शाखा
कमी पर्सेंटाइल मिळालेल्या, मात्र किमान गुणांची पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी इत्यादी. या ‘सीएसई’च्या तुलनेने कमी पर्सेंटाइलवर प्रवेश मिळणाऱ्या, मात्र चांगल्या संधी देणाऱ्या शाखांचा विचार जरूर करावा.
बीसीए/बीसीएस
कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स आणि प्रोग्रॅमिंगवर आधारित कोर्स. आयटी आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत करिअरसाठी उपयुक्त.
बीएस्सी कोर्सेस
बी.एस्सी. इन कॉम्प्युटर सायन्स, आयटी, डेटा सायन्स, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी या क्षेत्रात प्रोग्रॅमिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा अॅनालिटिक्स, ब्लॉकचेन डेव्हलपमेंट व सायबर सिक्युरिटी यांचे कौशल्य विकसित होते. आयटी, बँकिंग, फिनटेक, हेल्थकेअर, संरक्षण, मार्केट रिसर्च, ई-कॉमर्स, सप्लाय चेन यासारख्या क्षेत्रांत करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत.
बीएस्सी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जैवतंत्रज्ञान
या कोर्सेसमधून विज्ञान विषयांचे सखोल ज्ञान मिळते. रिसर्च, शिक्षण, फार्मा, केमिकल, डेटा अॅनालिटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, हेल्थकेअर, अन्न व औषध उद्योग यांसारख्या क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत.
बीएस्सी ॲग्रिकल्चर
शेती, बियाणं, खतं, जल व्यवस्थापन यांचा अभ्यास. कृषी क्षेत्रात संशोधन, शेती सल्लागार यासारख्या करिअर संधी.
इतर पदवी कोर्सेस
बीआर्क (आर्किटेक्चर) / बीप्लॅन
बिल्डिंग डिझाईन आणि प्लॅनिंग यावर आधारित हे कोर्स क्रिएटिव्ह आणि तांत्रिक विचारसरणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आहेत. ‘नाटा’ प्रवेश परीक्षा वर्षातून तीनदा आर्किटेक्चर प्रवेशा करिता देऊ शकता, सर्वोत्तम स्कोअर प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येतो. बीएस्सी सस्टेनेबल इंटेरियर डिझाईन हा नवीन कोर्स उपलब्ध आहे.
फार्मसी
औषधनिर्मिती, डोसिंग व केमिकल कंपोझिशन यावर लक्ष. फार्मा कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध. ‘पीसीएम’चे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतात.
बीव्होक (व्यावसायिक अभ्यासक्रम)
प्रॅक्टिकल स्किल्सवर आधारित या अभ्यासक्रमांमध्ये थेअरी कमी व प्रॅक्टिकल जास्त अशी संरचना असते. बी. व्होक इन ॲनिमेशन, इंटिरिअर डिझाईन, फॅशन टेक्नॉलॉजी, मीडिया कम्युनिकेशन, ज्वेलरी डिझाईन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इ. पर्याय आहेत.
बीबीए (व्यवसाय प्रशासन)
व्यवस्थापन कौशल्ये शिकवली जातात. मॅनेजमेंट, मार्केटिंग, एचआर, फायनान्समध्ये करिअर करू शकता.
बीएचएम/बीएचएमसीटी/बीएस्सी (हॉटेल व्यवस्थापन)
हॉटेल व हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत आवश्यक कौशल्य शिकवले जातात. खाण्यापिण्याची आणि व्यवस्थापनाची आवड असणाऱ्यांसाठी चांगले क्षेत्र आहे.
बीजेएमसी (पत्रकारिता आणि जनसंपर्क)
पत्रकारिता, मीडिया आणि कम्युनिकेशन क्षेत्रात अभ्यास. लिखाण व संवाद कौशल्य असणाऱ्यांसाठी योग्य.
एलएलबी (कायदा)
कायद्याचा सखोल अभ्यास असतो. वकील, न्यायाधीश, किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून काम करता येते.
फूड टेक्नॉलॉजी
खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता नियंत्रण व प्रक्रिया यावर आधारित कोर्स. एफएमसीजी व अन्न कंपन्यांमध्ये नोकरीसाठी उपयुक्त.
पॉलिटेक्निक अभ्यासक्रम
बारावीच्या गुणांवर पॉलिटेक्निक महाविद्यालयात डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो.
निष्कर्ष
जेईई/सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्याने आवडती शाखा व महाविद्यालय न मिळाल्यास निराश न होता, वरील पर्यायांद्वारे करिअरची पायाभरणी नक्की करता येऊ शकते. कोर्स निवडताना कल, करिअर गोल, कालावधी, क्षमता यांचा विचार व्हावा. उपलब्ध प्रवेश परीक्षा, पात्रता, प्रक्रिया व तारखांची माहिती अधिकृत संकेतस्थळावरून घ्यावी.