Solapur: सोलापूर 'आरटीओ'तील नऊ निरीक्षकांच्या बदल्या; गृह विभागाचे आदेश; सोलापूरला मिळाले सात वाहतूक निरीक्षक
esakal May 21, 2025 04:45 PM

सोलापूर : गृह विभागाने राज्यातील १५९ वाहतूक निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यात सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील नऊ वाहतूक निरीक्षकांचा समावेश आहे. पण, नऊ बदलून गेले आणि सोलापूर ‘आरटीओ’ला अवघे सात वाहतूक निरीक्षक मिळाले आहेत.

राज्यातील ‘आरटीओ’ कार्यालयांअंतर्गत काम करणाऱ्या वाहतूक निरीक्षकांच्या मागच्या वर्षी बदल्या झालेल्या नव्हत्या. तीन वर्षानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या अपेक्षित असतात, पण बदल्या न झाल्याने आता राज्यातील आरटीओ कार्यालयांकडील १५९ वाहतूक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

त्यात सोलापूर आरटीओ कार्यालयाकडील पल्लवी पांडव, प्रदिप बनसोडे, संदीप शिंदे, शिवाजी सोनटक्के, सचिंद्रकुमार राठोर, किरण गोंधळे, शीतलकुमार कुंभार, अविनाश आंभोरे व शिरीष पवार या नऊ वाहतूक निरीक्षकांचा समावेश आहे. तर सोलापूर आरटीओ कार्यालयाकडे आता नीलेश देशमुख, गणेश तपकिरे, राजन सरदेसाई, साधना कवळे, विशाल यादव, संतोष झगडे, धनंजय थोरे या सात वाहतूक निरीक्षकांची बदली झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अपघात व मृतांची संख्या पाहता आणखी वाहतूक निरीक्षकांची गरज भासणार आहे.

वसुलीच्या वृत्तानंतर बदल्या

यंदा परिवहन विभागाला गतवर्षीच्या तुलनेत अडीच हजार कोटींच्या जादा महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार परिवहन विभागाला यंदा १७ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा करावा लागणार आहे. ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक तयार करून त्यांना दरमहा प्रत्येकी २० ते ५० लाख रुपयांची वसुली (दंड) करण्याचे टार्गेट दिले. त्यानुसार पर्यटक, शेतकरी, प्रवासी अशा गाड्यांना अडवून दंड वसुली सुरू असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते.

त्यावर ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी व अभिजित पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठविला होता. त्यानंतर तीन दिवसांनी गृह विभागाने ‘आरटीओ’कडील १५९ वाहतूक निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यांच्या बदल्या तीन वर्षे पूर्ण होऊनही झाल्या नव्हत्या, त्यांचा या समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.