'फटाक्यांसारखा आवाज झाल्याने धावत आलो अन् गल्लीत पाहिले तर..'; कॉ. पानसरे प्रकरणात शेजाऱ्यांनी दिली महत्त्वाची साक्ष
esakal May 21, 2025 08:45 PM

कोल्हापूर : ‘गल्लीत फटाक्यांसारखा आवाज झाल्याने मी धावत आलो. गल्लीत पाहिले, तर गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी जखमी अवस्थेत दिसले. गोळी लागल्याने दोघेही गंभीर जखमी होते. रुग्णवाहिकेला फोन करत याची माहिती पानसरे कुटुंबीयांना दिली. यानंतर तातडीने दोघांना खासगी वाहनांतून उपचारासाठी नेण्यात आले,’ अशी साक्ष कॉ. गोविंद पानसरे (Govind Pansare Case) यांच्या शेजाऱ्याने न्यायालयात दिली.

कॉ. पानसरे हत्येचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या (Kolhapur Court) सुरू आहे. खटल्यातील साक्षीदारांच्या साक्षी व उलटतपास सध्या सुरू आहे. मंगळवारी घटनास्थळासमोरील बंगल्यात राहणाऱ्या साक्षीदाराची सरतपास सरकारी वकील हर्षद निंबाळकर व विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी नोंदवला.

घटनेच्या दिवशी सकाळी साक्षीदार हे मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाणार होते. मुलांची तयारी सुरू असताना साडेनऊच्या सुमारास त्यांना चार ते पाच फटाके फुटल्यासारखा आवाज जाणवला. त्यांनी गल्लीत डोकावून पाहिले असता एक पुरुष व महिला रस्त्यावर कोसळल्याचे दिसले. साक्षीदाराने खाली येऊन पाहिले असता जखमी हे गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा पानसरे असून, त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी वडिलांना याची माहिती देऊन रुग्णवाहिका मागवली होती.

दरम्यान, त्यांनी याची माहिती फिर्यादी मुकुंद कदम व पानसरे कुटुंबीयांना देताच त्यांनी खासगी वाहनांतून दोघांना उपचारासाठी रुग्णालयाकडे नेले. साक्षीदार पानसरे यांच्या घरापासून काही अंतरावरच राहण्यास असून, त्यांच्याच दारात हा प्रकार घडल्याची साक्ष त्यांनी न्यायालयात दिली. साक्षीदाराचा सरतपास आज पूर्ण करण्यात आला. पुढील सुनावणी ११ जूनला असून, त्यावेळी उलटतपास होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.