छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोन करा. आपत्ती काळात लोकांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सर्व यंत्रणांना दिले.
विभागीय आयुक्तांनी मराठवाडा विभागातील मॉन्सूनपूर्व तयारीचा मंगळवारी (ता. २०) आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी उपस्थित होते. विभागीय आयुक्तांनी हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मॉन्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतींची पडझड, पाणी साचणे तसेच जीवित व वित्तहानी घडणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करून जलद सेवा पुरवावी. सर्व प्रकल्पांचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. वीज अटकाव यंत्रणा सुस्थितीत असावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
पूर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरूप दुरुस्त्या करा. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी सीमांकन करावे. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करून आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवावे. जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाइईफ जॅकेट आदी विविध साधने, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, नियंत्रण कक्ष, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबींसंदर्भात संबंधित जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी करून घ्यावी. तसेच, वेळोवेळी यासंदर्भात आढावा घेण्याचे निर्देश गावडे यांनी दिले.
बैठकीत आयुक्तांनी केलेल्या सूचनाआपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवून हवामान विभागाचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचवा. विजेचे संकेत देणाऱ्या दामिनी ॲपचा वापर करण्याबाबत जनजागृती करावी.
बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉक ड्रिलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात. आपत्कालीन नियंत्रण कक्षातील यंत्रणांनी सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची खबरदारी घ्यावी.
पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी.
साथरोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी.
पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे. महानगरासह नगरपालिका क्षेत्रातील नाल्यांची सफाई कामे पूर्ण करावीत.