Electric Shock: विजेच्या धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू, महावितरणच्या प्रवेशदारावर मृतदेह, नातेवाईक आक्रमक..
esakal May 22, 2025 09:45 AM

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा : वीज पुरवठा बंद करून वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजेचा धक्का बसून आतीश जयराम लांडे या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढ्यातील नागणेवाडी येथे घडली. दरम्यात यात दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह महावितरणच्या प्रवेशद्वारासमोरून उचलणार नसल्याचा पवित्रा घेतला.

या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, अतीश जयराम लांडे हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून कामास होता. 18 मे रोजी मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथे वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला व विजेच्या डांबावरून खाली पडला त्याला तात्काळ उपचारासाठी सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना त्याचा आज दि.21 रोजी मृत्यू झाला.

या घटनेनंतर मंगळवेढ्यातील नातेवाईक व नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत सध्या महावितरणच्या मंगळवेढा शाखा कार्यालयात ठिय्या मांडला असून पावसाळ्याच्या तोंडावर वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे याच्या देखभाल दुरुस्तीकडे कोण लक्ष देत नाही परिणामी काही ठिकाणी खाजगी तर काही ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्याकडून काम करून घ्यावे लागत आहे त्यावेळेला जबाबदार कर्मचारी मुख्यालयात नसल्यामुळे अशा धोकादायक घटनेला सामोरे जावे लागते.

याकडे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. गत महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नारायण गोवे यांनी देखील या कार्यालयाच्या मनमानी कारभाराबद्दल आंदोलनाचा इशारा दिला होता दरम्यान अतीशचा मृतदेह महावितरणच्या मंगळवेढा शाखा कार्यालयासमोर ठेवला असून महावितरण चे जबाबदार कर्मचारी कोणीच उपस्थित नसल्यामुळे नागरिकांत संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. नातेवाईकांनी त्याला न्याय दिल्याशिवाय व संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह उचलणारा नसल्यास इशारा दिला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

आतिशच्या मृत्यूस कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, लाईनमन हे जबाबदार असून त्यांच्या निष्काकाळजीपणामुळे त्याचे कुटुंबउघड्यावर पडले असून यामध्ये दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.