International Tea Day 2025 : लाखो सोलापूरकरांचा दिवस कटिंगपासून स्पेशल चहापर्यंत; १८-२० प्रकारांची दररोज उलाढाल
esakal May 22, 2025 12:45 AM

संदीप गायकवाड

Explore Solapur’s Tea Culture: सोलापुराकरांचे चहा प्रेम इतके आहे की महिन्याकाठी साधारण २०० टन चहाची विक्री होते, असे चहाच्या ठोक व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारातील चहा दुकानांमधून १८ ते २० नैसर्गिक प्रकारच्या चहा पावडर विकल्या जातात.

शहरात जवळपास २० चहाचे ठोक व्यापारी आहेत तर फक्त चहा पावडर विकणारी जवळपास ६० ते ७० दुकाने आहेत. या दुकानांमधून वेगवेगळ्या प्रकारचा चहा विकला जातो. चहाच्या मळ्यामधून चहाची पाने तोडून ती जमा केली जातात. आणि त्या चहाच्या पानांपासून चहा पावडर तयार केली जाते.

ही पावडर तयार होत असताना जवळपास १८ ते २० प्रकारचे चहा या प्रक्रियेमधून तयार होतात. यामध्ये पानांचा दर्जा, चहाची जात महत्त्वाची आहे. पानापासून तयार होणारा चहा, देठापासून तयार होणारा चहा असे वेगवेगळे प्रकार तयार होतात. यामध्ये बारीक चहा पावडर, गोळी चहा यासह इतर प्रकारांचा समावेश होतो, प्रत्येक प्रकारच्या दर्जाच्या चहाची चव ही वेगळी असते. यामुळे यांच्या दरामध्ये सुद्धा फरक असतो.

आपल्याला हे माहीत आहे का? आपल्या माहीत आहे की चहाचे मळे असतात. या मळ्यातून चहाच्या झाडांच्या पानापासून चहा पावडर तयार केली जाते. मात्र आपल्याला हे माहित आहे का की चहाच्या मळ्यामध्ये जास्त उंचीवर असणाऱ्या भागांमधील चहा हा चवीला कडक असतो तर पायथ्याचा चहा रंगतदार असतो.

सर्वात दर्जेदार चहा हा दार्जिलिंग मधून येतो, त्याची चव व रंग सर्वोत्तम असतो यामुळे त्याचा दर थोडा उंच असतो. त्यात पाठोपाठ दार्जिलिंग वगळता आसाम मधील इतर भागातील चहा सोलापुरात विक्रीसाठी असतो तो थोडा साधारण असतो. दक्षिणेतूनही शहरात चहा विक्रीसाठी येतो मात्र त्याची चव थोडीशी तुरट असते यामुळे याचा दरही कमी असतो.

आपल्या शहरात चहाच्या बाबतीत ग्राहक चोखंदळ आहेत, शहरात चहाचा ठोक व किरकोळ मोठ्या प्रमाणात चालतो. चहा पावडर पासून ते चहा गोळी असे १८ ते २० नैसर्गिक प्रकार चहा मध्ये आहेत. आपल्या शहरात ब्रेडेड चहा पेक्षा सुटा चहा खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त आहे.

आशिष शहा, चहाचे ठोक विक्रेते, सोलापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.