आरोग्याची पुनर्बांधणी
esakal May 22, 2025 08:45 AM

- सायली शिंदे, योगतज्ज्ञ

पोट व कंबरेच्या ऑपरेशननंतर योग, आहार व दिनचर्येचं महत्त्व या विषयावर आज चर्चा करूया.

अनेक महिलांना पोटाशी संबंधित (गर्भाशय काढणे, हर्निया, सी-सेक्शन) किंवा कंबरेच्या (लंबर स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्क, हिप रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रियेनंतर पूर्ण बरे होण्यासाठी योग्य व्यायाम, योग, आहार आणि दिनचर्या अत्यंत महत्त्वाची असते.

ऑपरेशननंतर लक्षात ठेवायच्या गोष्टी : डॉक्टरांनी दिलेले विश्रांतीचे प्रमाण पाळा (प्रामुख्याने पहिल्या ४ ते ८ आठवड्यात जास्त विश्रांती); अचानक वाकणे, उचलणे, पोटावर जोर येणाऱ्या हालचाली टाळा. फार वेळ झोपून राहिले, तरी सूज, थकवा, मळमळ, पचन बिघडू शकते.

योगासने शस्त्रक्रियेनंतर सहा आठवड्यांनंतर सुरू करावीत. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वज्रासन : जेवणानंतर पाच-दहा मिनिटे या आसनात बसावे. या योगासनामुळे पचनतंत्र सुधारते, पोटावर दाब येत नाही

मकरासन : कंबरदुखी व सायटिका कमी करते, पाठीला आराम. गादीवर योग्य उशी घालून करावे.

सुप्त बद्धकोनाासन : गर्भाशयाच्या जागेची रिकव्हरी. मानसिक शांतता, पाठीला आधार देऊन करा.

शवासन : तणावमुक्ती, झोप सुधारते, मानसिक विश्रांती. शक्यतो शांत, मंद प्रकाशात दहा मिनिटे.

कशी करायची योगासने?

  • कोमल चटईवर, हळुवार हालचालीत

  • प्रत्येक आसन तीन-पाच वेळा

  • श्वासावर लक्ष द्या - दीर्घ श्वास, शांत गती

  • थकवा जाणवला तर थांबा. शरीराचे ऐका

चालणे : सर्वश्रेष्ठ व्यायाम

  • पहिल्या काही आठवड्यांमध्ये रोज १०-१५ मिनिटे घरात चालणे

  • नंतर ३० मिनिटांपर्यंत वाढवू शकता

  • वेगात नको, चालताना कंबर ताठ ठेवावी

  • थकवा जाणवताच बसून विश्रांती घ्या

आहार : पुनर्बांधणीचा आधार

सकाळी : गरम पाणी, भिजवलेले बदाम/कडधान्ये, ओव्याचा काढा.

दुपारी : घरचे शिजवलेले जेवण - ताजी भाजी, तूप-भात, मूगडाळ, ताक

सायंकाळी : सूप, फळे, भिजवलेले खजूर/अंजीर

रात्री : हलका आहार - मूग खिचडी, भाज्यांची पोळी

हे टाळा : बर्फाचे पदार्थ, पचायला जड अन्न, मैदा, फ्रीजमधील अन्न.

उपयुक्त घटक : हळद, सुके आले, ओवा, मेथी, आल्याचा रस - हे दाहशामक आणि पचनासाठी फायदेशीर

मानसिक आरोग्य

शस्त्रक्रियेनंतर मानसिक स्वास्थ्य टिकवणे गरजेचे आहे.

  • दररोज १० मिनिटांचे ध्यान - ‘मी ठीक होईन’, ‘माझे शरीर बळकट होत आहे’ असे सकारात्मक विचार

  • जप, संथ संगीत ऐकणे

  • आपल्यासारख्या महिलांशी संवाद – सकारात्मकता वाढते

शस्त्रक्रियेनंतर आरोग्य पुन्हा मिळवणे म्हणजे नव्याने जीवनाचे बीजारोपण. त्यासाठी हळू, स्थिर; पण सातत्यपूर्ण प्रयत्न गरजेचे आहेत. योग्य योगासने, चालणे, आहार व सकारात्मक मनोवृत्ती यांचा मिलाफ म्हणजे आरोग्य पुनर्बांधणीचे खरे शस्त्र आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.