अकोले : तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून, सोमवारी अकोले शहर आणि परिसरासह आढळा, प्रवरा खोऱ्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. यामध्ये मुथाळणे येथे तीन गोवंश जनावरांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रविवारी प्रवरा खोऱ्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला होता. सोमवारी गणोरे येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. दरम्यान, समशेरपूरनजीकच्या मुथाळणे येथील कानडवाडीचे शेतकरी संतू पुनाजी करवर यांच्या दोन गायी आणि एक कालवडीचा वीज पडून मृत्यू झाला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मृत गाय व कालवडीचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात होत आहे.
अवकाळी पावसाने अनेक घरांच्या भिंती पडून काही ठिकाणी पत्रे उडून नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब वाकले आहेत. रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी साठले आहे. या पावसाचा उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे.
तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, महसूल,कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
- वैभव पिचड, माजी आमदार