विश्वनिर्मितीचा शोध घेण्याचा ध्यास
esakal May 21, 2025 08:45 PM

Dr. Jayant Narlikar : होय, खऱ्याअर्थाने ‘प्राध्यापक’ जयंत नारळीकर आता आपल्यात नाहीत, हे खूप अस्वस्थ करणारं आहे. माझा त्यांच्याशी खूप जुना संबंध होता. हा काळ पंधरा वर्षांहून अधिक होता. मी १९९१ ते २०११ पर्यंत आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीशास्त्र केंद्रात (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स- आयुका) काम केले. डॉ. नारळीकर हे त्याचे संस्थापक संचालक होते. ही २२ वर्षे त्यांच्यासमवेत सतत प्रोत्साहनाने भरलेली होती. डॉ. नारळीकर यांचे आपल्यातून जाणं, हे प्रत्येक विज्ञानप्रेमींसाठी एक मोठे नुकसान आहे, तसेच प्रसारमाध्यमांनी एक चांगला मित्रदेखील गमावला.

डॉ. नारळीकर यांचे खगोलशास्त्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे योगदान प्रचंड मोठं आहे. त्या काळात संशोधन ज्या दिशेने सुरू आहे, त्याच्या एकदम विरुद्ध बाजूने जाऊन संशोधन उभं करणं ही मोठी बाब त्यांनी केली. हे करत असताना, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मात्र आपण जे संशोधन करतोय ते हटके आहे, चौकटीबाहेरचे आहे, तेच करा, हे म्हणून त्यांचे संशोधन पुढे नेण्यासाठी भाग पाडले नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संशोधन करण्याची मुभा मार्गदर्शक म्हणून कायमच त्यांनी दिली.

अनेक शास्त्रज्ञ संशोधन करतात, डॉ. नारळीकरदेखील शास्त्रज्ञाचं; पण विज्ञान प्रसारासाठी झटणारे हे अनोखे शास्त्रज्ञ होते. जनमाणसाच्या मनात दडलेला अंधविश्वास, अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी झटणारी व्यक्ती मित्र म्हणून आपण गमावली आहे. विज्ञान प्रसारणाचे काम करत असतानाच त्यांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अनेक अंगांनी मदत केली आहे. त्या काळी फलज्योतिष संशोधनात आणायचे, असा विषय सुरू होता. त्याला डॉ. नारळीकर यांनी कडाडून विरोध दर्शविला. त्या वेळी ते ‘आयुका’चे संचालक होते, परंतु हा विरोध त्यांनी ‘आयुका’चे संचालक म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणून विरोध दर्शविला. फलज्योतिष विषयाकडे विज्ञान म्हणून पाहू नये, असे पत्र त्यांनी तत्कालीन सरकारला लिहिले. ‘हे पत्र मी लिहिले आहे आणि ते माझ्या डेस्कवर ठेवले आहे, त्याला स्वाक्षरी करायची आहे त्याने ते करा,’ असे त्यांनी सर्वांना सांगितले; परंतु कोणताही दबाव आमच्यावर टाकला नाही. ‘फलज्योतिष यात विज्ञान नाही, ते मी गणित मांडून दाखवू, सिद्ध करू शकतो,’ असं त्याचं म्हणणं होतं.

सहज भेटणारे शास्त्रज्ञ

अत्यंत सज्जन पद्धतीने परिस्थिती हाताळणारं व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. नारळीकर यांच्याकडे पहावं. त्यांच्या आवडी-निवडीबाबत पाहिलं तर त्यांचं क्रिकेटवर विशेष प्रेम होतं. क्रिकेटपटू सौरभ गांगुली याची स्वाक्षरी घेण्यासाठी खुद्द स्वत: कोलकाता येथे गेले होते. विद्यार्थ्यांशी, सर्वसामान्य लोकांशी संबंध कायम ठेवणारे ते शास्त्रज्ञ. पुण्यात कोणालाही ‘आयुका’त जाऊन त्यांना भेटणं अगदी सोपं होतं, फक्त ते दिलेली वेळ काटेकोरपणे पाळतं. विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना सहज उत्तरं देण्यात त्यांची हातोटी होती.

रहस्य उलगडण्यात योगदान

संपूर्ण जगभरात अनेक नामवंत संस्था आणि शास्त्रज्ञांनी ‘विश्व प्रसरण पावत आहे,’ असा सिद्धांत मांडला. पण, या सिद्धांताच्याविरोधात जाऊन त्यांनी वेगळा सिद्धांत मांडला. त्यांच्या सिद्धांतानुसार, ‘हे विश्व प्रसरण पावत नाही. विश्व कधीच प्रसरण पावले नाही, ते होते तसेच आहे आणि तसेच राहणार आहे.’’ या मतावर ते ठाम होते. त्यांचा सिद्धांत अनेकांनी मान्य केला, अनेकांनी विरोध दर्शविला, तर काहींनी त्या सिद्धांताचा आधार घेत पुढील संशोधन केलं. डॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्रात मांडलेले सिद्धांत संशोधनाला मदत करणारे आहेत. महास्फोटातून विश्वानिर्मितीचा त्यांचा सिद्धांत विशेष गाजला. या सिद्धांताला नारळीकर यांनी ‘विश्वाची स्तरावत स्थिती’ हे नाव दिले असून, यावर संशोधन त्यांनी केले आहे.

संशोधनासाठी ‘आयुका’

भारतात अनेक संशोधन संस्था कार्यरत होत्या; परंतु त्यात संबंधित संशोधकांनाच संशोधन करण्याची मान्यता होती. म्हणूनच कोणत्याही प्राध्यापकांना, शिक्षकांना संशोधन करण्याची संधी मिळावी, म्हणून पुण्यात ऐंशीच्या दशकांत ‘आयुका’ची निर्मिती करण्यात आली. त्याआधी सामान्य शिक्षकाला, प्राध्यापकांना संशोधन करण्याला वाव नव्हता. परिणामी प्राध्यापकाला नवीन माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य नव्हते. परंतु, ‘आयुका’त संशोधन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी भरीव योगदान दिले. ‘आयुका’त सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनात मदत केली. असे हे मार्गदर्शक, सल्लागार, विज्ञानप्रसारक म्हणून कायम कार्यरत असणारे अनोखे खगोलशास्त्रज्ञ होते.

डॉ. जयंत नारळीकर यांच्याबाबतदेखील अगदी हेचं लागू होतं. विज्ञान आणि विशेषत: खगोलशास्त्र, खगोलभौतिकीशास्त्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानानुभवी हाताचा आधार देत यशोशिखरावर घेऊन जाणारं व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. नारळीकर यांच्याकडे पाहायला हवं.

- अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण, नेहरू केंद्र (मुंबई)

वैज्ञानिक घडविणारा शास्त्रज्ञ

त्यांचे म्हणणे होते की, ‘चांगले पीएच.डी. विद्यार्थी आकाशातून पडत नाहीत. त्यांना लहानपणापासूनच विज्ञानाची आवड निर्माण करावी लागते.’ त्यांच्या या स्वप्नाला मूर्तरूप दिले ते सुनीता देशपांडे (पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी) यांनी. सुनीता देशपांडे यांच्या देणगीतून २००४ मध्ये ‘मुक्तांगण विज्ञान शोधिका’ नावाने बालविज्ञान केंद्र सुरू झाले. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीशास्त्र केंद्राने (आयुका) सुरुवातीपासूनच जनजागृती कार्यक्रम सुरू केले. आठवड्यातून एकदा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लोकप्रिय विज्ञान व्याख्यान किंवा प्रात्यक्षिक आयोजित केले जात असे. यात पुण्यातील शाळांना सहभागी होता येत होते. डॉ. नारळीकर यांनी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी इंटर्नशिप हा कार्यक्रम सुरू केला. या काळात मुले शास्त्रज्ञांसोबत प्रकल्पांवर काम करत आणि विज्ञान करणं म्हणजे काय हे अनुभवत. २००३ मध्ये डॉ. नारळीकर यांनी आयुकाच्या बालविज्ञान केंद्रात काम करण्यासाठी मला आमंत्रित केले. सुरुवातीला मला शासकीय संस्थेत काम करायची फारशी इच्छा नव्हती. पण डॉ. नारळीकर यांनी मला आश्वस्त केले की, ‘मी विज्ञान केंद्र घडवण्यात मदत करू शकतो आणि आवडलं नाही तर सहा महिन्यांनी सोडून देऊ शकतो. त्यामुळे मी सहा महिन्यांसाठी सुरुवात केली आणि शेवटी मी ११ वर्षं तिथे काम केलं.

डॉ. नारळीकर हे पुनरुज्जीवन करणारे वैज्ञानिक होतं. त्यांनी मातृभाषेत (मराठी) विपुल लेखन केलं आणि विज्ञान कथा लेखनाचे प्रणेते होतं. ते विवेकवादी होते आणि त्यांनी कायमच अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांचे सहकारी होते. डॉ. नारळीकर यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्याने देण्यासाठी सतत आमंत्रण मिळत असत. व्याख्यानानंतर मुले त्यांच्याभोवती ‘स्वाक्षरीसाठी’ गर्दी करत. पण ते कधीच स्वाक्षरी देत नसत. ते म्हणत,‘‘पोस्टकार्डवर मला प्रश्न विचारा’ आणि मग ते उत्तर देताना त्यांच्या स्वाक्षरीसह पोस्टकार्ड पाठवत. डॉ. नारळीकर हे राष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या समितीचेही अध्यक्ष होते, शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि गणिताच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीत त्यांनी भरीव योगदान दिलं आहे.

देशातील सर्वांत सन्मानित खगोलभौतिकशास्त्रज्ञ अशी ओळख असणारे डॉ. जयंत नारळीकर हे खऱ्याअर्थाने शास्त्रज्ञ असण्यासोबतच विज्ञानप्रसारक होते. संशोधन संस्थेचा भाग म्हणून एक बालविज्ञान केंद्र स्थापन करणे, हे त्यांचं स्वप्नं होतं. का? कारण लहान वयातच मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, ही त्यांची इच्छा होती.

- अरविंद गुप्ता, विज्ञान प्रसारक व संशोधक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.