LeT terrorist Amir Hamza : भारताचा आणखी एक शत्रू पाकिस्तानातच ढेर होण्याच्या मार्गावर आहे. तो पाकमध्येच खल्लास होता-होता वाचलाय, त्याचं नाव म्हणजे आमिर हमजा. तो काही असा-तसा,साधआ दहशतवादी नाही. तर लष्कर चीफ हाफिज सईदचा उजवा हात म्हणून ओळखला जातो. एवढंच नव्हे तर तो कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सह-संस्थापक आहे. दहशतवादी आमिर हमजा हा गूढ परिस्थितीत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. लाहोरमधील रुग्णालयात तो मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती अतिशय गंभीर असून तो कधीही अखेरचा श्वास घेऊ शकतो, असंही समजतंय. भारतामध्ये मोस्ट वाँटेड दहशतवादी असलेला आमिर हमजा आहे तरी कोण, त्याची क्राईम कुंडलीच जाणून घेऊया.
खरंतर, दहशतवादी आमिर हमजावर अज्ञात हल्ला झाला आहे. त्याला गोळी लागली किंवा त्याच्यासोबत नेमकं काय झालं हे अजूनही गुपित आहे. पण तो लाहोरमधील रुग्णालयात शेवटचे श्वास घेतोय हे तर निश्चितच समोर आलंय. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदसोबत तो सतत असतो. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही तो वाँटेड आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमिर हमजा हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथील रहिवासी आहे.
नेमकं काय घडलं ?
त्याच्यासोबत नेमकं काय झालं हे गुपित अजून उलगडलेलं नाही. पण दहशतवादी हमीर हमजा याला मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर हल्ला झाल्याचं तेव्हाच सगळ्यांना समजलं. गंभीररित्या जखमी झालेल्या हमजाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या कपाळातून, नाकातून आणि शरीराच्या इतर भागातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. त्याला तातडीने लष्करी तळाच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र अद्यापही त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.
दहशतवादी हमजा आहे तरी कोण ?
कुख्यात दहशतवादी असलेला आमिर हमजा हे दहशतवादाच्या जगात एक भयानक नाव आहे. तो लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संस्थापकांपैकी एक आहे. हाफिज सईदचा तो राईट हँड असून आमिर हमजा याचा सल्ला घेतल्याशिवाय तो कोणतंही काम करत नाही असंही म्हटलं जातं. एवढंच नव्हे तर दहशतवादी हमजा हा लष्करच्या आघाडीच्या संघटनेचा, जमात-उत-दावाचा प्रमुखही आहे, ती प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर लष्करसाठी निधी उभारण्याचे काम करते. मुंबई हल्ल्यातही हमजा यांची महत्त्वाची भूमिका होती, असे म्हटले जाते. 2012 साली अमेरिकेने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. मात्र, गेल्या काही काळापासून हाफिज सईद आणि आमिर हमजा यांच्यात पैशावरून वाद सुरू असल्याची चर्चा आहे.
हमजाची क्राईम कुंडली
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर हमजाने हाफिज सईदसोबत मिळून भारताविरुद्ध लष्करची स्थापना केली. हमजाचा दहशतवादी प्रवास 1980 च्या दशकात सुरू झाला. त्याने दहशतवादी हाफिज सईद आणि अब्दुल रहमान मक्की यांच्यासोबत लष्कर-ए-तैयबाची स्थापना केली. भारतात दहशत पसरवणे आणि जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करणे हा यामागचा उद्देश होता. हमजाच्या गुन्हेगारी रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा सर्वात मोठा गुन्हा म्हणजे त्याने मुंबईवरील हल्ले घडवून आणले. एवढंच नव्हे तर मुंबई हल्ल्यांव्यतिरिक्त, हमजा हा जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा देखील मास्टरमाइंड आहे.
कोण-कोणत्या कारवायांमध्ये हमजाचा सहभाग ?
– मुंबई हल्ल्यात हात. मुंबई हल्ल्याच्या वेळी हमजा लष्करचा ऑपरेशनल कमांडर होता.
– 2024 साली, जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिव खोरी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला झाला होता.
– जम्मू आणि काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी, ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालवण्यात सहभागी.
– दहशतवादी हमजाने लष्करासाठी निधी उभारण्यात आणि नवीन दहशतवादी भरती करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.
– पीओकेमधील लाँच पॅडमध्ये त्यांची भूमिका.
हमजा आणि हाफिजचं वाजलं ?
खरंतर, 2018 साली, आमिर हमजा आणि हाफिज सईद यांच्यात लष्कर या दहशतवादी संघटनेसाठी उभारलेल्या निधीवरून मतभेद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय दबावाखाली, पाकिस्तान सरकारने या संघटनेला निधी घेण्यास बंदी घातली होती. हाफिज सईदने या प्रकरणात पाकिस्तान सरकारवर दबाव आणला नाही, अन्यथा या संघटनेवर देणग्या घेण्यावर बंदी घातली नसती असं तेव्हा हमजाला वाटलं होतं. त्यानंतर, कुख्यात दहशतवादील असलेल्या हमजाने जैश-ए-मनकाफा ही वेगळी संघटना स्थापन केली, जी निधी उभारण्याचे काम करत होती.
दहशतवादी हाफिजपासून मदभेद झाल्याने दूरी वाढली, तेव्हापासूनच हमजा गेल्या काही वर्षांपासून सक्रिय कारवायांमध्ये भाग घेत नव्हता. मात्र असे असले तरीही त्याने दहशतवाद्यांचे ब्रेनवॉश करणे सुरूच ठेवले. पण आता तो मरणासन्न अवस्थेत असून त्याला इतकं गंभीर जखमी कोणी केलं हे एक गूढ असून ते अजूनही उलगडलेलं नाही. पोलीसही यावर काहीच बोलायला तयार नाहीत. लष्कराकडून तर कोणतही विधानच आलेलं नाही. त्यामुळे ही माहिती अजूनही गूढ राहील असं दिसतंय.