प्रशिक्षकाने खेळाची गरज ओळखावी
esakal May 21, 2025 11:45 AM

- महेंद्र गोखले, ट्रेनर, फिजिकल कन्सल्टंट

कोणत्याही खेळासाठी केवळ खेळाडूची कामगिरी महत्त्वाची नसते, तर त्याचं आरोग्यही खूप महत्त्वाचं असतं. त्याची खेळण्याची क्षमता ही आरोग्यावर अवलंबून असते आणि यासाठीच महत्त्वाचा असतो, तो खेळाडूचा ‘फिटनेस!’ यामुळे उत्तम प्रशिक्षक त्याच्या खेळाडूच्या फिटनेसवर सर्वाधिक काम करतो.

खेळाडूंचे ‘फिटनेस ट्रेनर’ होण्यासाठी काय केलं पाहिजे?

- या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला क्रीडा क्षेत्राची आवड आणि पार्श्वभूमी असायला हवी. तुम्हाला खेळण्याची आवड आणि सवय असायला हवी. त्याची सखोल माहिती व शिस्त असायला हवी. तुमच्याकडे येणारा खेळाडू कोण आहे? त्याचा खेळ कोणता? त्या खेळाची गरज काय? हे तुम्ही ओळखायला हवं! त्यानुसार प्रशिक्षण द्यावं आणि फिटनेसवर काम करावं. हे क्षेत्र तसं अजूनही फारसं आखीव-रेखीव नाही. त्यामुळे कोणीही अपूर्ण माहितीवर किंवा काही व्हिडिओ पाहून प्रशिक्षण देणं सुरू करतं. मात्र, असं अजिबात करू नये. पालक आणि मुलांनीही याबाबत सजग राहावं.

प्रशिक्षकाकडे कोणती कौशल्ये असावीत?

- एखादा खेळ खेळणं आणि आणि तो शिकवणं यात फरक आहे. शिकवणं ही कला आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व बारकावे माहीत असावे लागतात. फिजिऑलॉजी, ॲनोटॉमी, शरीररचना, हालचाली याची माहिती असावी लागते. प्रशिक्षकाने या दृष्टीने अभ्यास करावा. उमेदवारी करण्याची तयारी ठेवावी. काम सुरू केल्यावर लगेच पैसे मिळाले पाहिजे, ही धारणा ठेवू नये. अभ्यासासोबतच विविध अनुभव घेण्याची तयारी असायला हवी. प्रशिक्षकाने खेळाडूचे आरोग्य हे पहिले ध्येय ठेवावे. प्रशिक्षणातून पैसा कमावण्याचे ध्येय ठेवू नये.

या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणते अभ्यासक्रम उपयुक्त आहेत?

- बॅचलर इन स्पोर्ट्स सायन्सचे अभ्यासक्रम आहेत. सिंबायोसिस, डी. वाय. पाटील नेरूळ, मणिपाल विद्यापीठ, ग्वालियर अशा विविध ठिकाणी हे अभ्यासक्रम राबवले जातात. अमेरिकेचा सी.एस.सी.एस. हा अभ्यासक्रम जागतिक स्तरावर प्रमाण मानला जातो. असे अनेक अभ्यासक्रम आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. प्रशिक्षणात तुम्हाला करिअर करायचं असेल तर आवर्जून एखादी पदवी किंवा सर्टिफिकेट कोर्स करा. त्यामुळे तुम्हाला तांत्रिक बाबींसह अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील.

प्रशिक्षकांसाठी..

  • तुम्ही स्वत: जास्तीत जास्त नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.

  • खेळाडूसोबत तुम्ही स्वत: मेहनत करण्याची तयारी ठेवा.

  • पालकांशी संवाद साधा. त्यांना मुलाची बलस्थाने व उणिवांची जाणीव करून द्या.

(शब्दांकन : मयूर भावे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.