मुंबई - कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात बुधवारी (ता. २१) चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली २२ मेच्या आसपास याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर ते उत्तरेकडे सरकून आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी २१ ते २५ मेदरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिला आहे.
कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाटभागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २०-२३ मेदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह विखुरलेला हलका तसेच मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
केरळमध्ये येत्या ४-५ दिवसांत मॉन्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्रातील काही भाग, मालदीवचा उर्वरित भाग आणि कोमोरिन परिसरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकण किनाऱ्यावर आणि त्याच्या बाहेर २१ आणि २४ मे रोजी ३५ किमी ते ४५ किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह ५५ किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. २४ मे रोजी दक्षिण कोकण, गोव्याच्या किनाऱ्यावर आणि त्याजवळील ३५ किमी परिसरात ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह वादळी हवा असेल. मच्छीमारांनी या कालावधीत वर उल्लेख केलेल्या भागात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.