रिमोट वर्क आणि जागतिक करिअर
esakal May 21, 2025 11:45 AM

- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स

वाईट गोष्टीतून चांगलं काही तरी निघते याचे उदाहरण म्हणजे कोरोनामुळे ऑनलाइन मीटिंग आणि रिमोट वर्किंगचा उदय. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे.

आजची तरुण पिढी भौगोलिक मर्यादांमध्ये अडकून राहिलेली नाही. रिमोट वर्क आणि जागतिक करिअरच्या संकल्पना विद्यार्थ्यांना आणि नवोदित व्यावसायिकांना जागतिक पातळीवर काम करण्याची संधी देत आहेत.

रिमोट वर्क म्हणजे काय?

रिमोट वर्क म्हणजे कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता, इंटरनेटच्या साहाय्याने घरातून किंवा कोणत्याही ठिकाणाहून काम करणे. कोरोनानंतर या पद्धतीला मोठा वेग मिळाला असून अनेक कंपन्या ही प्रणाली कायमस्वरूपी स्वीकारत आहेत. डब्ल्यूएफएच आणि डब्ल्यूएफए म्हणजेच कुठूनही काम करून चालेल.

विद्यार्थ्यांसाठी संधी

विद्यार्थ्यांना रिमोट इंटर्नशिप्स, फ्रिलान्स प्रोजेक्ट्स आणि ऑनलाइन कामाच्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी मिळते. यामुळे त्यांना जागतिक अनुभव, व्यावसायिक नेटवर्क आणि विविध संस्कृतींशी संवाद साधण्याचा लाभ होतो. एरवी काम म्हणजे कार्यालयात जाऊन करण्याची गोष्ट होती, आता तसं काही राहिलं नाही.

वेळेच्या अडचणीवर मात

पूर्वी परदेशी कंपनीसोबत काम करण्यासाठी स्थलांतर करणे आवश्यक होते. आता झूम, गुगलमीट, स्लॅक यांसारख्या टूल्समुळे वेळेचा फरक सांभाळत संवाद साधणे शक्य झाले आहे. इंग्रजीचे मूलभूत ज्ञान असेल, तर जागतिक संधींचा लाभ घेता येतो. इंग्रजीचं ज्ञान हे लिखित आणि वाचिक दोन्ही गरजेचं आहे.

करिअरचा विस्तार

रिमोट वर्कमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर काम करता येते. जसे की डिजिटल मार्केटिंग, कंटेंट रायटिंग, डेटा अॅनालिटिक्स, वेब डेव्हलपमेंट, युएक्स/युआय डिझाईन इ. या अनुभवांमुळे सीव्हीमध्ये विविधता येते आणि भविष्यातील संधी वाढतात.

आव्हाने आणि उपाय

रिमोट वर्कमध्ये वेळेचे नियोजन, स्वतःचे शिस्तबद्ध व्यवस्थापन, आणि संवाद कौशल्ये महत्त्वाची असतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वेळेचा ताळमेळ, आणि वैयक्तिक प्रेरणा यांसारखी आव्हाने असली, तरी त्यावर योग्य नियोजनाने मात करता येते.

निष्कर्ष

रिमोट वर्क आणि जागतिक करिअरमुळे विद्यार्थ्यांसमोर अनंत संधी खुल्या झाल्या आहेत. भौगोलिक अडथळ्यांवर मात करत त्यांनी आता जगभरातील कंपन्यांमध्ये आपली कारकीर्द घडवण्याची तयारी सुरू करावी. जगभरातील कंपन्यांना सुद्धा भारतीय टॅलेंट उपलब्ध झालं आहे.

जग तुमच्या स्क्रीनवर आहे, आता पुढे पाऊल टाका!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.