एकाग्रता आणि एकलक्षता
esakal May 21, 2025 11:45 AM

- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

आयुष्यातील महत्त्वाचा पैलू म्हणजे एकलक्षता. उंच शिखर गाठायचे असल्यास त्यावर १०० टक्के लक्ष आणि आपली ऊर्जा केंद्रित करणे गरजेचे आहे. उठता, बसता, खाता-पिता आपण आपल्या अंतिम लक्ष्याविषयी विचार केल्यावरच ध्येय साध्य होऊ शकते. आपले काम, मग तो अभ्यास असो, व्यवसाय असो किंवा नोकरी असो- तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे नाकारून चालणार नाही.

त्यामुळे जीवनाच्या विविध टप्प्यांवर हा समतोल साधता आला पाहिजे. आपली सगळी ऊर्जा, ध्यान, मन, तन, वेळ आपल्या ठरलेल्या लक्ष्यावर केंद्रित आणि एकाग्र करत नाही तोपर्यंत संघर्ष करावा लागणारच.

बारावीच्या परीक्षेच्या काळात अभ्यास आणि उच्चशिक्षणासाठी लागणाऱ्या परीक्षेची पूर्ण वेळ तयारी न केल्यास कितीही हुशार असलो तरी इतरांपेक्षा मागेच राहणार. शासकीय परीक्षेसाठी तयारी करत असाल तर बाकी सगळे तात्पुरते सोडून फक्त आणि फक्त ‘कॉम्पिटिटिव्ह’ परीक्षेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तरच यशाची अपेक्षा ठेवता येईल.

संघर्ष प्रत्येकाला करावाच लागतो, तो जेवढ्या लवकर कराल तेवढ्या त्याचे फळ पुढे योग्य पद्धतीने मिळते. नोकरीतही असेच आहे. जे नेहमी आपल्या कामाविषयी चर्चा करतात त्यांना लोक ‘वर्कहोलिक’ म्हणतात. परंतु त्यांचे लक्ष कामांवर असल्याने त्यांना कामातील अडथळे आणि त्याचे निवारण लवकर सापडते आणि तेच पुढे त्यांच्या यशाचा मोठा भागीदार बनते.

एकलक्षतेला एकाग्रतेने साधण्याचा प्रयत्न केला तर खूप पुढे जाता येते. अर्थात आपण शारीरिक किंवा मानसिक स्थैर्य कमी करावे, असे अपेक्षित नाही. परंतु काहीही करताना आपले लक्ष ढळू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एकाग्रता म्हणजे इंग्रजीत ‘फोकस.’

आपले मन एकाग्रतेने आपल्या लक्ष्यावर काम करील त्या प्रमाणात यशाचा अपेक्षा वाढतील. अगदी क्रिकेटमध्ये शतक करायचे लक्ष्य असल्यास एकलक्षतेबरोबर एकाग्रतेने फलंदाजी केली तरच शक्य आहे. अन्यथा थोडेजरी लक्ष विचलित झाले तर विकेट पडली म्हणून समजायचे.

एकलव्याने दुरूनच एकलक्ष्य ठेऊन उत्तम धनुर्धर होण्यासाठी आपले मन इकडे तिकडे न भरकटता सलग सराव केला. द्रोणाचार्यांनी त्याची परीक्षा घेतली तर तो खरेच एक असामान्य धनुर्धर बनलेला होता. त्यामुळे अपेक्षित संसाधने नाहीत म्हणून आपण कमी पडतोय या सबबी आपल्याला एकलक्षता आणि एकाग्रतेने आपले ध्येय गाठायचे ठरविले तर अडथळे आणू शकणार नाहीत.

एकलक्षता ठेवण्यासाठी कामाच्या ठिकाणी तुमचे लक्ष्य संक्षिप्त परंतु अतिशय सूचक शब्दात लिहून ठेवले तर सतत आपल्याला आठवण करून देत राहील. पुन्हा पुन्हा आठवण करून त्यावर एकाग्रतेने काम सुद्धा करता येतील. तुम्ही स्वतः हे प्रत्यक्षात करून बघायला हरकत नाही. सुरुवात छोट्या लक्ष्यापासून करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.