आयपीएलच्या 18 व्या मोसमात 60 सामन्यांनंतर प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स या 3 संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. तर आता एका जागेसाठी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात रस्सीखेच आहे. तर दुसऱ्या बाजूला प्लेऑफच्या शर्यतीतून 5 संघांचा पत्ता कट झाला आहे. मंगळवारी 20 मे रोजी त्या 5 पैकी 2 संघ आमनेसामने असणार आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे या संघांसाठी हा प्रतिष्ठेचा सामना असणार आहे. त्यामुळे चेन्नई आणि राजस्थान दोघांचा हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. त्याआधी 30 मार्च रोजी राजस्थान विरुद्ध चेन्नई भिडले होते. तेव्हा रंगतदार झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईवर 6 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता चेन्नईकडे या सामन्यात विजय मिळवून मागील पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी आहे.
फक्त 1 सामन्याचा अपवाद वगळला तर चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघाची सारखीच स्थिती आहे. राजस्थानला 13 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच विजयी होता आलं आहे. तर तब्बल 10 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे. तर चेन्नईला 12 पैकी 3 सामन्यांमध्येच यश मिळवता आलंय. चेन्नईने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. मात्र या मोसमात चेन्नईला चॅम्पियन्स प्रमाणे कामगिरी करण्यात अपयश आलं. त्यात स्पर्धेदरम्यान कर्णधार बदलला. त्याचाही काही प्रमाणात चेन्नईला फटका बसला. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी दहाव्या स्थानी आहे.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात एकूण 30 सामने खेळवण्यात आले आहेत. या 30 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये चेन्नईचा बोलबाला राहिला आहे. चेन्नईने राजस्थानवर 16 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 14 सामन्यांमध्ये पलटवार करत चेन्नईवर मात केली आहे.
दरम्यान चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना नवी दिल्ली अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल. तसेच हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह मॅचचा थरार पाहायला मिळेल.