Prakash Ambedkar : सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग चालू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचा आदेश दिल्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. पर्यायाने राज्यातील राजकीय पक्षदेखील कामाला लागले आहे. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाच्या आगामी रणनीतीवर मोठं भाष्य केलंय. ते धाराशीवमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आम्ही भाजपा हा पक्ष वगळता कोणाशीही युती करायला तयार आहोत, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाला आता महाविकास आघाडी नेमका कसा प्रतिसाद देते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे पक्षपातळीवर आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा झाल्यानंतर या निवडणुकीबाबत काय भूमिका पुढे येते हे लवकरच स्पष्ट होईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याच निवडणुका लक्षात घेता लातूर तसेच धाराशीव येथे पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
वंचित बहुजन आघाडी हा राज्यातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. दलित तसेच इतर बहुजन या पक्षाचे मतदार आहेत. त्यामुळे हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार असून यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या घटकपक्षांच्या रणनीतीत बदल करावे लागतील. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? प्रकाश आंबेडकरांना सकारात्मक प्रतिसाद देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर यासारख्या तसेच राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत तसेच काही ग्रामपंचायतींच्याही निवडणुका होतील. त्यामुळेच आता आघाडी आणि युतीचं गणितत स्थानिक पातळीवर आखलं जातंय. त्या-त्या पक्षांच्या नेत्यांनीही या निवडणुकांबाबत काही निर्णय हे स्थानिक पातळीवर होतील तर युतीबाबतचे काही निर्णय हे राज्य पातळीवर घेतले जातील, अशी भूमिका काही पक्षांनी घेतली आहे. यात भाजपा, अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच इतर महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे.