आयपीएल 2025 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. प्लेऑफसाठी चार पैकी तीन संघ ठरले आहे. तर चौथ्या संघासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी स्टार फलंदाज आणि विकेटकीपर केएल राहुलबाबत चिंता वाढवणारी बातमी आली आहे. सराव करताना केएल राहुलच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे प्लेऑफसाठी होत असलेल्या महत्त्वाच्या सामन्याआधीच दिल्लीची धाकधूक वाढली आहे. कारण केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजीचा कणा आहे. त्याचं संघात असणं खूपच महत्त्वाचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केएल राहुल नेट प्रॅक्टिस करत असताना मुकेश कुमारचा चेंडू लागला. यामुळे त्याला तीव्र दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. पण वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर देखरेख ठेवून आहे.
केएल राहुलने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात नाबाद 112 धावांची भागीदारी केली. तसेच टी20 क्रिकेटमध्ये 8 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा पल्ला वेगाने गाठणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यामुळे केएल राहुलचं संघात असणं खूपच महत्त्वाचं आहे. जर केएल राहुल या सामन्याला मुकला तर त्यांची फलंदाजी कमकुवत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दिल्लीने गमावला तर स्पर्धेतून आऊट होईल. तसेच मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल.
दुखापतीनंतर केएल राहुल मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना खेळणार की नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे. दुसरीकडे, ही दुखापत गंभीर नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे केएल राहुल या सामन्यात खेळेल अशी आशा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. केएल राहुलने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यात 61.62 च्या सरासरीने आणि 148.04 च्या स्ट्राईक रेटने 493 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या फलंदाजीमुळे दिल्लीला जबरदस्त फायदा झाला आहे.