उल्हासनगरमध्ये बेकायदा वैद्यकीय व्यवसाय उघड
esakal May 20, 2025 09:45 PM

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : वैद्यकीय व्यवसाय करण्याचा कायदेशीर परवाना नसतानाही उपचार करत असलेल्या दोन डॉक्टरांविरोधात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानेरे गाव उल्हासनगर-४ येथील श्री साई या क्लिनिकवर ही कारवाई करण्यात आली. डॉ. श्रीकृष्ण कुमावत व डॉ. देवेंद्र पुजारी यांच्याविरोधात संबंधित तक्रार दाखल झाली आहे.
डॉ. समीर सरवणकर (वय ४२) यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार उल्हासनगरमधील मानेरे गाव येथे असलेल्या श्री साई क्लिनिकमध्ये डॉ. कुमावत आणि डॉ. पुजारी या डॉक्टरांकडे राज्य सरकारचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत जारी केलेले कोणतेही वैध प्रमाणपत्र वा परवाना नसतानाही ते त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करत होते. तपासादरम्यान वैद्यकीय व्यवसाय करण्याची मान्यता नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याविरोधात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास विठ्ठलवाडी पोलिस करत असून, क्लिनिकच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.