Sofiya Qureshi : कर्नल सोफिया कुरैशीवर अपमानास्पद वक्तव्य; देशभरात तुफान संताप,'सेनेचा अपमान सहन केला जाणार नाही'
esakal May 20, 2025 09:45 PM

अकोला : मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करातील शूर महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

याच पार्श्वभूमीवर नरसिंहपूर शहरातील मुख्य बसस्थानकावर जन सत्याग्रह संघटनेतर्फे जोरदार आणि प्रतीकात्मक चप्पल मारो आंदोलन छेडण्यात आले. लवकरच याचे पडसाद राज्य व राष्ट्रीय पातळीवर उमटतील, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे.

"सेनेचा अपमान सहन केला जाणार नाही!" या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मध्यप्रदेश उच्च न्यायालयानेही विजय शाह यांच्या वक्तव्याला "गटारसदृश भाषा" ठरवून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जनतेच्या रोषाचा आवाज आता रस्त्यांवर उमटू लागला आहे. या आंदोलनाद्वारे जन सत्याग्रह संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विजय शाह यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

तसेच, संघटनेने इशारा दिला की यापुढे जर कोणीही भारतीय लष्कराबाबत अवमानकारक भाषा वापरली, तर त्यास अधिक तीव्र आणि गंभीर स्वरूपात प्रत्युत्तर दिले जाईल. या आंदोलनाचे नेतृत्व आसिफ अहमद खान यांनी केले.

त्यांच्यासोबत फिरोज खान, मुजाहिद खान पठाण, शेख नईम, विक्कीभाई, शेख सद्दाम, शेख मोहसिन, मोहम्मद एवेस, अब्दुल वहिद खान, मोहम्मद अहफाज, शेख एजाज, कृष्णभाई, संतोष भाऊ, रितेश भाऊ व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पडले, परंतु जनतेच्या आवाजातून एक स्पष्ट संदेश मिळाला – भारतीय सेनेचा किंवा तिच्या शूर महिला अधिकाऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही! आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की हा लढा फक्त एका व्यक्तीविरुद्ध नसून त्या मानसिकतेविरुद्ध आहे जी महिलांचा आणि सेनेचा सन्मान ठेवत नाही. जन सत्याग्रह संघटनेचे हे आंदोलन आता केवळ एक शहरापुरते मर्यादित न राहता, सत्ताधाऱ्यांच्या कानांवर आदळू लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.