Kalyan News: डॉ. बाबासाहेबांच्या वारसांच्या जमिनीवर अतिक्रमण, चक्क ७ मजली इमारत उभारली; KDMC चा भू-माफियांना दणका
Saam TV May 20, 2025 09:45 PM

अभिजित देशमुख 

कल्याण : राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी अतिक्रमण करत सात मजल्याची इमारत उभारली आहे. याप्रकरणी तक्रार येताच केडीएमसीने संबधीत विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली. दरम्यान आज पोलीस बंदोबस्तात इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

जवळ असलेल्या दावडी येथे सेंट जॉन शाळेसमोरी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी अतिक्रमण करत सात मजली इमारत उभी केली होती. या जमिनीच्या ७/१२ वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह आणखी दोन नावे आहेत. दरम्यान आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात आले. 

केडीएमसीकडे बांधकाम तोडण्यासाठी पाठपुरावा 

यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी संबधित भूमाफियाला जाब विचारत याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देत याप्रकरणी मदत करण्याची मागणी केली होती. यानंतर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी प्रशासनाकडे तक्रार करत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली होती. मागील अडीच वर्षापासून नवसागरे याप्रकरणी पाठपुरावा केला होता. 

अखेर अतिक्रमित इमारत पाडण्यास सुरवात 

या दरम्यान एका विकासकाने अर्धवट काम सोडले होते. तर दुसऱ्या विकासकाच्या मदतीने संबधित भूमाफियाने अर्धवट राहिलेल्या इमारतीचे काम पूर्ण केले. यादरम्यान पालिका प्रशासनाने विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणी पोलिसांनी एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर आज या इमारतीवर पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई सुरू करण्यात आली. लवकरच ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे केडीएमसी उपायुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.