बेघर कुटुंबांचे आवास सर्वेक्षण पूर्ण करा
esakal May 20, 2025 09:45 PM

वडगाव मावळ, ता. २० : मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत येत्या ३१ मेपर्यंत बेघर कुटुंबांचे आवास २०२४ सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात यांनी केले आहे.
ग्रामपंचायतींना आपापल्या कार्यक्षेत्रातील बेघर कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करून घेण्यासाठी यापूर्वी १५ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, अद्यापही शंभर टक्के बेघर कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव यांनी आवास २०२४ सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंतची पुन्हा मुदत दिली असून, या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण करून घेण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत.
मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आवास २०२४ चे सर्वेक्षण ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करून सर्व बेघर पीएमएवायजी टप्पा २ अंतर्गत घरकुल पात्र कुटुंबांचे विनाविलंब सर्वेक्षण पूर्ण करावे. तसेच शंभर टक्के सर्वेक्षण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात यांनी दिल्या आहेत. योजनेच्या सर्वेक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार नसल्यामुळे ज्या ग्रामपंचायतींचा सर्वे जरी झाला असेल तरी त्यांनीदेखील पुन्हा खात्री करून घ्यावी व विनाविलंब सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे, असे प्रधान व थोरात यांनी सर्व ग्रामपंचायतींना कळवले आहे.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.