Jalgaon Accident : दोन महिन्यापूर्वी प्रेमविवाह, तीन दिवसापूर्वी बर्थडे, आज भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; आई-बापासह बायकोचा आक्रोश
Saam TV May 20, 2025 10:45 PM

जळगाव : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. या अपघातांमध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू देखील होत असतो. त्याचदरम्यान, जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच अंत झालाय. भरधाव चाकचाकी वाहनाची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक बसली. या धडकेत रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला, आणि तरुणाचा मृत्यू झाला. भटू पाटील (भटू बाबा) असं मृत तरुणाचं नाव आहे.

तालुक्यातील मंगरुळ एमआयडीसीजवळ आज सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा जागीच चक्काचूर झाला. हृदयद्रावक बाब म्हणजे भटू पाटील याचा तीन दिवसांपूर्वीच वाढदिवस होता. त्याच्या मित्रपरिवाराने त्याचा वाढदिवस खूप जल्लोषात साजरा केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे भटूने अडीच महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला होता. मात्र, नियतीला काही औरच मान्य होतं. आई-बापाला आपल्या लेकाची आणि बायकोला आपल्या नवऱ्याची बातमी कळल्यानंतर त्यांनी एकच टाहो फोडला. तरुण तडफदार लेक गेल्यानं सर्वत्र नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भटू बाबा हा स्वभावाने खूप चांगला आणि मनमिळावू होता. तो सर्व मित्रांना हवाहवासा वाटायचा पण काळाने त्याच्यावर घाला घातला आणि त्याला हिरावून घेतलं.

४० लाखांची दारू जप्त

दरम्यान, बंदी असताना आजही मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचे धुळ्यात झालेल्या कारवाईतून समोर आलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रात शुल्क चुकवून चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या एका टोळीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ४० लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त करण्यात आली असून यासंदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.

दारूची वाहतूक आणि विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील सर्रासपणे परराज्यातून दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अशाच प्रकारे धुळे जिल्ह्यातून ट्रकमधून वाहतूक केली जात असताना राज्य उत्पादन शुल्क चुकवून जाणार्यावर कारवाई करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर-सामोडे रोडावर सदरची कारवाई करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.