तुंबणाऱ्या पाण्यावर प्रभावी उपाययोजना
esakal May 20, 2025 10:45 PM

तुंबणाऱ्या पाण्यावर प्रभावी उपाययोजना
पूर्व उपनगरात अत्याधुनिक पंप बसवणार; निविदा प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुसळधार पावसात तुंबलेल्या पाण्याचा लवकर निचरा व्हावा, यासाठी पूर्व उपनगरात ‘ऑटो प्रोम डिवॉटरिंग पंप’ बसवण्याचा निर्णय पर्जन्य जलवाहिनी विभागाने घेतला आहे. त्यामुळे पूर्व उपनगरातील लोकांची पाणी तुंबण्याच्या त्रासापासून सुटका होण्याची शक्यता आहे.
पाणी उपसा करण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या पंपांना फ्लो मीटर बसवण्यात येणार आहेत. या फ्लो मीटरमुळे पंपांची पाणी उपसण्याची नेमकी क्षमता कळणार आहे, शिवाय कोणत्या पंपाने किती वेळात, किती क्षमतेने पाणी उपसा केला हेदेखील नेमके समजणार आहे. त्यामुळे कोणत्या भागात आणि किती वेगात पाणी तुंबते, हे लक्षात येणार आहे, शिवाय तेथील पंपाने किती क्षमतेने पाणी उपसा केला, याची नेमकी महिती समजणार आहे. त्यामुळे येथील जलमुक्तीसाठी पुढील पावलं उचलण्यास यामुळे मदत मिळणार आहे.
पर्जन्य जलवाहिनी विभागाने यासंदर्भात निविदा प्रकाशित केली आहे. निविदा सादर करण्याचा बुधवार (ता. २१) शेवटचा दिवस आहे. ३१ मेपर्यंत निविदा प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण करून पंप बसवले जाणार आहेत.
पावसाळा तोंडावर आला असून, यंदा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागात पाणी साचण्याची शक्यता वाढली आहे. यावर महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हिंदमाता, गांधी मार्केट आणि मिलन सबवेमधील तुंबलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.
उपनगरातही कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, मुलुंड आदी भागांत मुसळधार पावसात पाणी साचण्याच्या घटना घडतात. यासह पूर्व द्रुतगती मार्गावरदेखील काही ठिकाणी पाणी तुंबते. सातत्याने पाणी तुंबणाऱ्या परिसरामध्ये डिजिटल माहिती फलक बसवले जाणार आहेत. याची जोडणी प्रत्येक पंपासोबत केली जाईल. त्यामुळे जमलेले पाणी, त्याचा कालावधी, त्याचा निचरा आणि त्यासाठी लागलेला कालावधी याची नेमकी माहिती पाहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
पाणी तुंबणारी ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेराने जोडली जाणार आहेत. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू असताना तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवता येणार आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाला तातडीने उपाययोजना करता येतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.