अलिबाग, ता. २० (वार्ताहर)ः काही दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला आहे. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने घामाच्या धारांनी नागरिक बेहाल होत आहेत. ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. काही ठिकाणी दिवसभर गेलेली वीज रात्री तीन-चार तासांसाठी येते. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती कामे, झाडांच्या छाटणीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
शहरी भागातील नागरिकांकडून एसी, पंखे, कूलर, फ्रीजचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी साधारण १५ टक्क्यांनी वाढली आहे. जिल्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या भागात दररोज किमान एक ते दोन तास वीज खंडित होते. अतिरिक्त भार वाढल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचा दावा महावितरण करीत आहे, तर वाढलेल्या उष्णतेमुळे विद्युत रोहित्रांमधील तेल कमी होणे, काही यंत्रे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असून, दुरुस्तीची कामे वाढल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
दिवसभरात दोन-तीन वेळा तरी वीजपुरवठा खंडित होत आहे. अलिबाग, रोहा, खालापूर, सुधागड, पोलादपूर परिसरात कायमच वीज गायब होत असल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यांच्या गावात दुपारच्या वेळी अर्धा ते पाऊण तास वीजपुरवठा खंडित होत आहे. सकाळच्या वेळेत नागरिकांची कामावर जाण्याची गडबड आणि त्यात वीज गेल्याने कामे खोळंबतात. दुपारी पुरवठा खंडित होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हैराण होत आहेत.
पावसाळापूर्व कामांची लगबग
आठवडाभरापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीजवितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. हे टाळण्यासाठी पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यासाठी शटडाऊन घेतले जात आहेत. विजेअभावी नागरिक मात्र बेजार होत आहेत.
सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात २० ते २१ मे रोजी ‘यलो अलर्ट’ आणि २२ मे रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. वातावरणात उष्मा वाढल्याने घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.