मालवणात वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण
अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग व्यवस्था; पर्यटन हंगामात नियोजन शून्य
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० ः शहरात सध्या पर्यटकांची गर्दी असून मोठ्या संख्येने पर्यटकांची वाहने शहरात दाखल झाली आहेत. आधीच अरुंद रस्ते व पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने पर्यटकांच्या वाहनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार होत असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासन तसेच पोलिस यंत्रणेकडून कोणतेही नियोजन केले नसल्याने त्याचा फटका पर्यटक व स्थानिकांना बसत आहे. पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणासाठी कोणीही सक्षम पोलिस कर्मचारी अथवा वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात केला नाही. केवळ नवख्या होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या जीवावर वाहतुकीचा ताण रेटला जात असल्याचे चित्र शहरात आहे.
शहरात दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक दाखल होतात. यंदाच्या पर्यटन हंगामाताही मालवणात बहुसंख्य पर्यटकांनी भेट दिली आहे. सध्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी शहरात झाली आहे. शहरातील अरुंद रस्ते हा नेहमीच कळीचा मुद्दा असून पर्यटकांमुळे वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे. देऊळवाडा ते भरड नाका, भरड नाका ते बाजारपेठ मार्गे बंदर जेटी, मेढा राजकोट रस्ता या रस्त्यांवर सर्वात जास्त वाहतूक कोंडी होत आहे. असे असताना भरड नाका, देऊळवाडा नाका, बाजारपेठ सकपाळ नाका, फोवकांडा पिंपळ, बंदर जेटी रस्ता या महत्वाच्या आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी एकही सक्षम पोलीस कर्मचारी दिसून येत नाही. भरड नाक्यावर कधीतरी वाहतूक पोलिस कर्मचारी दिसून येतात. शहरात काही ठिकाणी केवळ नवखे होमगार्ड दिसून येत आहेत.
---
पर्यटक, स्थानिकांमध्ये खटके
बंदर जेटी परिसरातील पार्किंग व्यवस्था सोडल्यास शहरात कुठेही पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. वाहतूक कोंडी तसेच रस्त्यालगत गाडी पार्किंगवरून पर्यटक व स्थानिक नागरिक यांच्यात खटकेही उडत आहेत. अशावेळी सक्षम पोलिस कर्मचारी तैनात असावा. त्याकडे पोलिस यंत्रणेने पुरेसे लक्ष द्यावे. अनेक ठिकाणी नागरिक व पर्यटकांनाच वाहतूक नियंत्रित करावी लागत आहे.
--
कोट
शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता किमान पर्यटन हंगामात तरी वाहतूक व्यवस्था होमगार्ड भरोसे सोडली जाऊ नये, पोलिस कर्मचारी अथवा वाहतूक पोलिस तैनात करावेत.
- प्रवीण रेडकर, पर्यटक, वेंगुर्ले