फुरसुंगी - वादळी वाऱ्यासह मंगळवारी फुरसुंगी परिसरात जोरदार पाऊस झाला. येथे जाहिरातीचे होर्डिंग, कमान, सोसायटीतील वाहनतळाची छत उचकटने, सोसायटीची स्वागत कमान पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र नागरिकांची तारांबळ उडाली.
परिसरात दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. जवळपास पाऊणतास झालेल्या पावसातच वाऱ्याचाही जोर होता. वाऱ्याने येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळील जाहिरातीचे होर्डिंग पडले. बाजूला असणाऱ्या हॉटेलच्या छताला टेकल्याने ते अडकले. त्यामुळे दुर्घटना टळली. याच्याच बाजूने नवीन पावर हाऊसकडे जाणाऱ्या मार्गावर जाहिरातीची कमान पडली. रस्त्याच्या मधेच कमान पडल्याने काही काळ रस्ता बंद होता.
येथील पर्ल सोसायटीमधील वाहनतळासाठी करण्यात आलेले छत वाऱ्याने उचकटले. मात्र भिंतीचा आधार मिळाल्याने ते उडून गेले नाही. येथे उभा असणाऱ्या एका चारचाकी गाडीच्या काचा फुटून नुकसान झाले. असे येथील रहिवाशी दत्ता कामठे यांनी सांगितले. भोसले व्हिलेज या सोसायटीचे स्वागत कमान पडली. यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने दुघटना टळली.
कमानीची उंची आणि लांबी जास्त असल्याने कमान पडली. मात्र रस्ता बंद झाला नाही. असे येथील रहिवाशी रवी चौगुले, गंगाधर यादव यांनी सांगितले. सॉलिटर सोसायटीच्या मागील बाजूस असणारे झाड सरंक्षण भिंतीवर कोसळले, त्यामुळे सरंक्षण भिंत तुटून नुकसान झाले. झाड नाल्याच्या बाजूला पडल्याने दुघटना टळली.