स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा, अजित पवार गटात समझोता झाला आहे. गिरीश महाजन यांना कुंभमेळामंत्री, छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करून शिंदे गटाची पुरती फरफट करण्यात येणार आहे, अशी चर्चा महायुतीत सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात महायुतीत अजित पवार गटाचे सर्वाधिक सात, भाजपाचे पाच, एकनाथ शिंदे गटाचे दोन आमदार असे बलाबल आहे. कमी संख्या असतानाही शिंदे गटाने पालकमंत्रीपदावर दावा करणे योग्य नसल्याचे बोलले जात आहे. रायगडच्या बदल्यात नाशिकचे पालकमंत्रीपद द्या, अशी या गटाची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीत या गटाने देवळाली, इगतपुरीत उमेदवार उभे करून अजित पवार गटाला शह दिला होता. येवला, दिंडोरीतही तसे करण्याचा प्रयत्न झाला होता. यामुळे अजित पवार गट शिंदे गटाचा हिशेब चुकता करण्याची संधी शोधत आहे. छगन भुजबळ यांच्या रूपाने या गटाला जिल्ह्यात तिसरे मंत्रिपद मिळाले आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांना नंदुरबारचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी येणाऱ्या निधीहून अधिक निधी हा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार आहे. सिंहस्थाचे जगभर ब्रॅण्डींग होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरण घोषित केलेले आहे, यामुळे भाजपाला सिंहस्थाच्या प्रशासकीय कारभाराचे नियंत्रण स्वतःकडे ठेवणे अधिक महत्त्वाचे वाटते. मागील सिंहस्थाचा अनुभव गाठीशी असल्याने गिरीष महाजन यांना कुंभमेळा मंत्री करण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जाते. यामुळे पालकमंत्रीपदाच्या वादात किंवा स्पर्धेत आम्ही नाहीच, हेही भाजपाला स्पष्ट करणे सोयीचे होणार आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा अनुभव आणि शिंदे गटापेक्षा जास्त आमदार संख्या, कुंभमेळा प्राधिकरण वगळता प्रशासनावरील नियंत्रण हे कारण पुढे करून नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांच्याकडेच नाशिकचे पालकमंत्रीपद देण्यावर भाजपाने सहमती दर्शविल्याचे बोलले जात आहे. आपल्या गटाला पालकमंत्रीपद मिळत असेल तर वाद नकोच, आपसात स्पर्धा नको, अशी भूमिका या गटातील मंत्री नरहरी झिरवाळ व माणिकराव कोकाटे या मंत्र्यांनी घेतली आहे, तशी तंबीच त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची चर्चा आहे. पालकमंत्री झाल्यानंतर भुजबळ हे भाजपाच्या आमदारांना झुकते माप देतील, हे ठरले आहे, यामुळे भाजपा आमदारांनी या विषयावर वाद निर्माण करू नये, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांना दिल्याची चर्चा आहे.कुंभमेळा प्राधिकरणाव्यतिरिक्त उर्वरित जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भुजबळांकडे राहणार असल्याने रायगडमध्ये बदल करण्याचा किंवा तिथे दावा करण्याचा शिंदे गटाचा संबंधच नाही, असा सूर अजित पवार गटातून निघत आहे.
पालकमंत्रीपदासाठी चुरस वगैरे मी मानत नाही, माझा कशावरच दावा नाही. भुजबळांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला आणि नाशिकला फायदा होईलच. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे माणिकराव कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. पहिल्या टप्प्यात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या भुजबळांनी ‘जहाँ नही चैना, वहाँ नही रहना’ असे केलेले भाष्य उतावीळपणाचे होते. ते आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, काहीवेळा वाट बघावी लागते, लगेचच एखाद्या गोष्टीवर भाष्य करणं चुकीचं असतं, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.