Jyoti Malhotra WhatsApp chat with ISI handler Ali Hassan : हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हिसार पोलिसांनी अटक केली आहे. तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, सध्या तिची कसून चौकशी सुरू आहे. या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अशातच आता ज्योती आणि ISI एजंट यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या चॅटमध्ये "प्रोटोकॉल" आणि "गुप्तचर" यांसारख्या शब्दांचा उल्लेख आहे. या संभाषणांमुळे ज्योतीचा उपयोग भारतातील रॉ (RAW) एजंट्सची माहिती गोळा करण्यासाठी केला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या चॅट समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांची चिंता वाढली आहे.
सूत्रांनुसार, हे व्हॉट्सअॅप संभाषण ज्योती मल्होत्रा आणि ISI चा हँडलर अली हसन यांच्यातील आहे. एका चॅटमध्ये हसनने ज्योतीला विचारले, "तू अटारी सीमेवर असताना तिथे कोणाला विशेष प्रोटोकॉल मिळताना दिसले का?" यावर ज्योतीने असं काही आढळले नसल्याचे उत्तर दिले. यावर हसन म्हणाला, "प्रोटोकॉल मिळणाऱ्या व्यक्तीवरून गुप्तचरांची ओळख पटवता येते." याला प्रत्युत्तर देताना ज्योती म्हणाली, "ते इतके मूर्ख नव्हते." या संभाषणाने तपास यंत्रणांचा संशय अधिकच बळावला आहे.
दरम्यान, ही चॅट पुढे आल्यानंतर आता ज्योतीची आणखी कसून चौकशी केली जाते आहे. तसेच तिचा मोबाईल, लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. याशिवाय बँक अकाउंटही गोठवण्यात आहे. तिच्या बँक खात्यांचाही तपास केला जातो आहे. ज्योतीने पाकिस्तानबरोबरच चीन आणि बांगलादेशचा दौरा केला आहे, या दौऱ्याचा तपास सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे तिच्या वैयक्तिक डायरीत पोलिसांना काही नोंदी आढळून आल्या आहेत. त्याचाही बारकाईने तपास केला जातो आहे.