11th Admission: अकरावीच्या माहिती पुस्तिकेत घोळच घोळ; विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ, नेमकं प्रकरण काय?
esakal May 21, 2025 04:45 AM

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील अकरावीचे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठीची माहिती पुस्तिका मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या पुस्तिकेत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इनहाऊस कोटा, तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत स्पष्टता नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. यासह माहिती पुस्तिकेत असंख्य चुका असल्याचे लक्षात येताच, शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करीत, बुधवारी (ता. २१) सुधारीत माहिती पुस्तिका उपलब्ध करणार असल्याचे शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी सांगितले.

संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या माहिती पुस्तिकेत असंख्य त्रुटी आहेत. प्रामुख्याने राखीव जागांमध्ये इनहाऊस कोट्याचा उल्लेखच केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कोट्यातील प्रवेशासाठी कोणता पर्याय निवडावा, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच पृष्ठक्रमांक २५ वर शून्यफेरीमध्ये कोट्याचे प्रवेश केले जातील असा उल्लेख आहे. मात्र प्रत्यक्षात नियमित पहिल्या फेरीच्या वेळापत्रकात शून्यफेरीचा कोठेही उल्लेख नसल्याने त्यावरूनही गोंधळ आहे. शिवाय माहिती पुस्तिकेतील माहिती व वेळापत्रकात विसंगती असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

पृष्ट क्रमांक २५ वर द्विलक्षीचे प्रवेश हे महाविद्यालय स्तरावर गुणवत्तेनुसार करण्याचे नमूद केले आहे; पण द्विलक्षी विषयाचे प्रवेश केव्हा होतील, याबाबत स्पष्टता नाही. तसेच पृष्ठ क्रमांक २७ वर प्रवेशप्रक्रियेचा तक्ता दिला आहे. त्यात प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्याने ऑनलाईन संमती देणे बंधनकारक आहे किंवा नाही याचा कोठेही उल्लेख नाही. पृष्ठ क्रमांक २९ वर इनहाऊस कोटा तसेच व्यवस्थापन कोट्यातील जागा कधी भरता येतील, याबाबत माहिती दिली आहे, मात्र ६ मे रोजीच्या शासन निर्णयामध्ये या जागा दुसऱ्या फेरीपर्यंतच भराव्यात आणि शिल्लक जागा पुढील फेरीसाठी प्रत्यार्पित करून घेण्यात येतील, असे नमूद केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

समांतर आरक्षणाचा घोळ

पृष्ठ क्रमांक ३५ वर प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी पाच टक्के आरक्षणाचा उल्लेख आहे, मात्र ६ मे रोजीच्या शासन निर्णयामध्ये सदर समांतर आरक्षण दोन टक्केच ठेवले आहे. तसेच पृष्ठ क्रमांक ४१ वर अर्जाचा भाग एक भरून प्रमाणित करण्याबाबत उल्लेख केला आहे, मात्र प्रत्यक्षात ऑनलाइन प्रवेश अर्जात त्याबाबत कुठेही सुविधा दिलेली नाही.

विविध माहितीत तफावत

माहिती पुस्तिकेत पृष्ठ क्रमांक ४१ वरील मुद्दा क्र. अ (३) व (४) तसेच मुद्दा क्र. क (८), (१३), (१४) मुद्दा क्र. ड (१७), (१८) मधील माहिती व प्रवेश अर्जातील माहितीत तफावत दिसत आहे. तसेच पृष्ठ क्रमांक ४५ वरील प्रवाह तक्ता व त्याखालील माहिती चुकीची दिल्याने विद्यार्थी, पालकांसह कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर गोंधळ निर्माण झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.