CSK vs RR Live: आयुष म्हात्रे, शिवम दुबे, डेवॉल्ड ब्रेव्हिस यांनी दिला चेन्नईला आधार; राजस्थानसमोर उभं केलं सन्मानजनक लक्ष्य
esakal May 21, 2025 04:45 AM

IPL 2025 vs Rajasthan Royals: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. आयुष म्हात्रे व डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या फटकेबाजीला शिवम दुबे व महेंद्रसिंग धोनी यांची साथ मिळाली. राजस्थानच्या युधवीर सिंगने सुरुवातीला CSK ला धक्के दिले होते, परंतु चेन्नईने चांगले पुनरागमन केले.

  • राजस्थानने फझलहक फारुकीच्या जागी युधवीर सिंगला, तर चेन्नईने मथिशा पथिराणाच्या जागी शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले.

  • चेन्नई सुपर किंग्स - आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी, आर अश्विन, नूर अहमद, अंशूल कंबोज, खलील अहमद.

  • राजस्थान रॉयल्स - यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वनिंदू हसरंगा, क्वेमा मफाका, युधवीर सिंग, तुषार देशपांडे, आकाश मढवाल.

बऱ्याच दिवसांनी परतलेल्या डेवॉन कॉनवेला ( १०) दुसऱ्या षटकात युधवीर सिंगने माघारी पाठवले. युधवीरने त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उर्विल पटेलला भोपळ्यावर बाद करून चेन्नईला १२ धावांत दुसरा धक्का दिला. आर अश्विनला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. युधवीरच्या पुढच्या षटकात आयुष-अश्विन जोडीने २४ धावा कुटल्या. या जोडीने २२ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. आयुष २० चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ४३ धावांवर बाद झाला. मफाकाने सुरेख झेल टिपला अन् तुषार देशपांडेला ही विकेट मिळाली.

त्यानंतर चे विकेटचे सत्र सुरू राहिले. आर अश्विन ( १३) व रवींद्र जडेजा ( १) यांना अनुक्रमे विनंदू हसरंगा व युधवीर यांनी बाद केले. २ बाद ६८ वरून चेन्नईची अवस्था ५ बाद ७८ अशी झाली. शिवम दुबे व डेवॉल्ड ब्रेव्हिस यांनी चेन्नईचा डाव चांगला सावरला. यांची ३६ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी आकाश मढवालने तोडली. ब्रेव्हिस २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. त्याच्या विकेटनंतर महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला अन् स्टेडियम दणाणून गेले.

दुबे व धोनी यांचा खेळ शेवटच्या षटकांत मंदावला होता, नाहीतर चेन्नईने आणखी धावा उभारल्या असत्या. शिवम दुबे ३२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर मढवालच्या गोलंदाजीवर बाद झाला. धोनी १६ धावांवर ( १७ चेंडू) माघारी परतला, तुषार देशपांडेने अफलातून झेल घेतला. CSK ने ८ बाद १८७ धावा केल्या. शेवटच्या ३ षटकांत चेन्नईला फक्त १७ धावा करता आल्या.

धोनी ३५० ट्वेंटी-२० षटकार मारणारा चौथा भारतीय
  • ५४२ – रोहित शर्मा (४४६ डाव)

  • ४३४ – विराट कोहली (३९३ डाव)

  • ३६८ – सूर्यकुमार (२९७ डाव)

  • ३५०* – एमएस धोनी (३५५ डाव)

  • ३४८ – संजू सॅमसन (२४३ डाव)

  • ३३१ – केएल राहुल (२२४ डाव)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.