मुंबई : सलग काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर दुपारपासून अखेर जोरदार पावसाने दिलासा दिला. विशेषतः मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली आहे. अंधेरी, वर्सोवा, जोगेश्वरी, गोरेगाव: या भागांत मागील १५–२० मिनिटांपासून जोरदार पावसास सुरुवात झाली.
पाऊस पडत आहे. बांद्र्यामध्ये या प्रमुख विभागातही पावसाची सरी सुरू झाल्या असून रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. पूर्व उपनगरातही पावसाचे आगमन झाले आहे. भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपरमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. या परिसरांतही विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून उष्णता कमी झाली आहे.
सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले होते. काही ठिकाणी तापमान ३५ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले होते. पावसामुळे थोडीशी गारठा वाढलेला असून विजांच्या गडगडाटामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी उघड्या ठिकाणी न थांबण्याचे आणि विजेपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
पश्चिम उपनगरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे. दहिसर पूर्व एस वी रोड शिवाजी रोड पेट्रोल पंप परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. मागील अर्ध्या तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शाळा, कार्यालयांमध्ये पावसाच्या तयारीचे निर्देश देण्यात आले. पुढील २–३ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत पश्चिम किनारपट्टीवर विजांसह पावसाचा जोर वाढू शकतो.