CSK vs RR Live: राजस्थान रॉयल्सचा शेवट गोड! चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करून IPL 2025 चा घेतला निरोप
esakal May 21, 2025 05:45 AM

IPL 2025 Chennai Super Kings vs : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा शेवट गोड केला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी दणदणीत विजयाची नोंद केली. यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी व संजू सॅमसन यांनी सुरुवातच दमदार सुरुवात करून देताना CSK ला बॅकफूटवर फेकले. राजस्थानने हा सामना सहज जिंकून स्पर्धाचा निरोप घेतला.

आयुष म्हात्रेने दमदार सुरूवात करून देऊनही चेन्नई सुपर किंग्सला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, आर अश्विन व रवींद्र जडेजा स्वस्तात बाद झाल्याने चेन्नईचा संघ अडचणीत सापडला. आयुषने २० चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ४३ धावांची खेळी केली. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसने २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा केल्या. शिवम दुबने ३९ धावा केल्या, परंतु त्यांना वेग नव्हता. महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा संथ खेळी केली आणि १७ चेंडूंत १६ धावा करून माघारी परतला.

राजस्थानच्या गोलंदाजांनी शेवटच्या ३ षटकांत फक्त १७ धावा देत चांगले पुनरागमन केले आणि चेन्नईला ८ बात १८७ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. युधवीर सिंग ( ३-४७) व आकाश मढवाल ( ३-२९) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे व वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

राजस्थानसाठी यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करताना १९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारासह ३६ धावांवर त्रिफळाचीत झाला. अंशुल कंबोजने ही विकेट मिळवली. यशस्वीने या पर्वात १४ सामन्यांत ४३ च्या सरासरीने ५५९ धावा केल्या आहेत. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने मोर्चा सांभाळला. तो राजस्थान रॉयल्सकडून ४,००० आयपीएल धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने १४४ डावांमध्ये हा टप्पा गाठला. त्यानंतर जॉस बटलरच्या ३०५५ या सर्वाधिक धावा आहेत. वैभव सूर्यवंशी आज संयमी खेळ करताना दिसला आणि संजूसह त्याने ३३ चेंडूंत अर्धशतकीय भागिदारी पूर्ण केली.

वैभवने ११व्या षटकात रवींद्र जडेजाला लगावलेले दोन खणखणीत षटकार पाहण्यासारखे होते. संजूने आणखी एक विक्रम नावावर केला आणि तो ट्वेंटी-२०त ३५० षटकार मारणारा पाचवा भारतीय ठरला, याच सामन्यात ने याच विक्रमात चौथा भारतीय होण्याचा मान पटकावला होता. वैभवने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वैभव व संजू यांनी ५९ चेंडूंत ९८ धावांची भागीदारी केली, संजू ३१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४१ व वैभव ३३ चेंडूंत प्रत्येकी ४ चौकार-षटकार खेचून ५७ धावांवर बाद झाला. आर अश्विनने एकाच षटकात या दोन्ही सेट फलंदाजांना बाद केले.

ही दोघं बाद झाली तेव्हा राजस्थानला ३६ चेंडूंत ५० धावा करायच्या होत्या. रियान परागला ३ धावेवर नूर अहमदने माघारी पाठवून सामन्यात थोडी रंगत आणली. अश्विनने टाकलेल्या १७व्या षटकात ध्रुव जुरेल व शिमरोन हेटमायर यांनी १८ धावा चोपून सामना एकतर्फी केली. जुरेलने १८व्या षटकाचा पहिलाच चेंडू षटकार खेचून राजस्थानचा विजय पक्का केला. RR ने १७.१ षटकांत ४ बाद १८८ धावा केल्या. जुरेल १२ चेंडूंत ३१ धावांवर नाबाद राहिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.