'पंतप्रधान मोदी म्हणाले 'हे' होणार नाही, पण आज हजारो कोटी थेट तुमच्या खात्यात..'; राहुल गांधींचा भाजपवर थेट हल्लाबोल
esakal May 21, 2025 09:45 PM

बंगळूर : भाजप (BJP) निवडक श्रीमंत लोकांना पैसे आणि संसाधने मिळतील, असे मॉडेल राबवत आहे, तर काँग्रेसच्या मॉडेलमध्ये गरिबांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत तसेच गरिबांच्या खिशात टाकले जात आहेत, असा लोकसभेतील विरोधी पक्षनेते (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी भाजपवर हल्लाबोल केला.

राज्यातील काँग्रेस सरकारला (Congress Govt) दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘साधना मेळाव्या’त ते बोलत होते. याच कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना एक लाखाहून अधिक मालकी हक्कपत्रे वाटप करण्यात आली. ‘कागदपत्रे नसलेल्या वस्त्या’ अशा नोंदी होत्या. त्या वाडी-वस्तींना महसुली गावे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

राहुल गांधी म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. निवडणुकीच्या काळात आम्ही तुम्हाला म्हणजे कर्नाटकातील मतदारांना आश्वासने दिली होती. आम्ही पाच हमी योजना जाहीर केल्या होत्या. भाजपच्या नेत्यांनी सांगितले की, काँग्रेस या योजना पूर्ण करू शकणार नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे होणार नाही; पण आज हजारो कोटी रुपये थेट तुमच्या बँक खात्यात टाकले जात आहेत. हे पैसे तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, तुमच्या आरोग्यासाठी वापरू शकता. आम्हाला हेच हवे होते.

भाजपला फक्त निवडक लोकांना देशाचा संपूर्ण पैसा मिळवून द्यायचा आहे, पण आम्हाला तो पैसा थेट गरीब, मागास, दलित, आदिवासींच्या खिशात जावा, असे वाटते. जेव्हा आम्ही तुमच्या खिशात पैसे टाकतो तेव्हा तो पैसा बाजारात जातो आणि त्यामुळे उत्पादन वाढते आणि तुम्ही हे पैसे तुमच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये खर्च करता, तेव्हा पैसा गावांमध्ये येतो आणि कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होतो.’’

भाजपच्या मॉडेलमध्ये संपूर्ण पैसे दोन-तीन अब्जाधीशांना दिले जातात, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, हे अब्जाधीश गावांमध्ये किंवा शहरात पैसे खर्च करत नाहीत; परंतु ते लंडन, न्यूयॉर्क आणि इतर ठिकाणी मालमत्ता खरेदी करतात. भाजपच्या मॉडेलनुसार तुमचे पैसे काही निवडक लोकांच्या हातात जातात. त्यांच्या मॉडेलमध्ये रोजगार संपतो, पण आमच्या मॉडेलमध्ये रोजगार निर्माण होतो.

त्यांच्या मॉडेलमध्ये जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही कर्जबाजारी व्हाल. आमच्या मॉडेलमध्ये तुमच्या खिशात पैसे असतील आणि तुमचे उपचार होतील. त्यांच्या मॉडेलनुसार खासगी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना शिक्षणासाठी लाखो पैसे द्यावे लागतात, असे ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, रणदीपसिंग सुरजेवाला, पक्षाचे नेते आणि मंत्री उपस्थित होते.

सहावी हमी योजना

राज्यात पंचहमी योजना लागू करणाऱ्या काँग्रेस सरकारने सहावी हमी योजना म्हणून जमिनीची मालकी प्रदान करणारी जमीन हमी लागू केली आहे. एक लाखाहून अधिक लोकांना हक्कपत्रे वाटली आहेत. लाखो लोकांकडे जमीन होती, पण त्यावर मालकी नव्हती. अशा एक लाखाहून अधिक लोकांना जमिनीची मालकी प्रमाणपत्रे दिली आहेत. २००० झोपड्या आणि तांड्यांना महसुली गावे म्हणून घोषित केले आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.