ठेव रकमेवर बनावट पद्धतीने
कर्ज दाखवून फसवणूक
बॅंक अधिकाऱ्यासह २४ जणांविरोधात तक्रार
कुरुंदवाड, ता. २० ः अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील सन्मती सहकारी बँकेच्या शाखेत ठेव ठेवलेल्या रकमेवर बनावट पद्धतीने कर्ज दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करीत संगीता सचिन मेथे (रा. अब्दुललाट) यांनी याप्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी यांच्यासह २४ जणांविरोधात कुरुंदवाड पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली.
मेथे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात तळंदगे शाखेत हा प्रकार घडल्याचे नमूद केल्याने तक्रार अर्ज हुपरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणिस यांनी सांगितले.
मेथे यांनी २०२० मध्ये पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत यंत्रमाग उद्योगासाठी २४ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर २१ लाख ५० हजारांची रक्कम ठेव स्वरूपात बँकेत जमा केली होती. मात्र, व्यवसायात अडचणी आल्याने त्यांनी २०२२ मध्ये ठेवी मोडून कर्जात समाविष्ट करण्याची विनंती केली. परंतु शाखाधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. दरम्यानच्या काळात खातेउताऱ्यात आधारे मार्च २०२५ मध्ये अब्दुललाट शाखेत ठेवी असूनही तळंदगे शाखेतून त्यांच्या नावावर कर्ज दाखवण्यात आल्याचे उघडकीस आले, असे तक्रारीत म्हटले आहे.
कोट
मेथे यांना दिलेल्या कर्जप्रकरणी सर्व प्रक्रिया कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच केली आहे. थकीत कर्जाच्या पार्श्वभूमीवर गहाण मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असताना ही तक्रार केली आहे. आम्ही पोलिसांकडे सर्व कागदपत्रे सादर केली असून, तपास सुरू आहे. तपासात सत्य निष्पन्न होईल
-अशोक पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी.