Highway Accident : राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात सहा जण ठार; कार, व्हीआरएल बस, कंटेनरची एकमेकांना जोराची धडक
esakal May 22, 2025 12:45 PM

बंगळूर : विजापूर जिल्ह्यातील मनगुळीजवळील राष्ट्रीय महामार्ग (National Highway Accident) क्रमांक ५० वर बुधवारी (ता. २१) सकाळी भीषण अपघात झाला. मोटार, व्हीआरएल खासगी बस आणि कंटेनर यांच्या तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.

येणारी मोटार आणि मुंबईहून बळ्ळारीकडे जाणारी बस आणि कंटेनरमध्ये हा अपघात झाला. मोटारीमधील चारही जण आणि बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर कंटेनरचालक गंभीर जखमी झाला.

तेलंगण राज्यातील टी. भास्करन मलकंठन, त्यांची पत्नी पवित्रा, मुलगा अभिराम आणि मुलगी जोस्ना यांचा या अपघातात मृत्यू झाला. सुदैवाने भास्करन यांचा दुसरा मुलगा १० वर्षांचा प्रवीण तेजा हा बचावला; पण तो गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात मोटारचालक विकास शिवप्पा माकानी याचाही मृत्यू झाला. याशिवाय कलगुतगी तांडा येथील बसचालक बसवराज राठोड याचाही मृत्यू झाला आहे.

भास्करन हे कॅनरा बँकेचे व्यवस्थापक होते. हुलजंती येथील कंटेनर चालक चन्नाबासू सिद्धप्पा माळी जखमी झाला. पोलिसांना मृतदेह मोटारीमधून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शंकर मरिहाळ, ग्रामीण डीएसपी सुल्पी आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. ही घटना मनगुळी पोलिस ठाण्याच्या (Manguli Police Station) हद्दीत घडली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.