Marathwada Rain : मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर; अनेक जिल्ह्यांत रात्रीतून मुसळधार, वाचा काय आहे हवामान खात्याचा अंदाज
esakal May 22, 2025 02:45 PM

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात बुधवारी पहाटे एक वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध भागांत मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. याशिवाय नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. परभणीतील पाथरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. संभाजीनगर शहरात रात्री साडेदहावाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. तो उशिरापर्यंत सुरू होता.

लातूरला धो-धो धुतले

लातूर ः लातूर शहर आणि परिसरात बुधवारी (ता. २१) अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. कॉइलनगर, नंदी स्टॉप आदी भागांत काही घरांमध्ये पाणी शिरले. मे महिन्यात रखरखते ऊन असते. पण, यंदा उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव लातूरकर घेत आहेत. बुधवारी सकाळी साडेआठवाजेपासून एक तास पाऊस झाला. दुपारी चारला पुन्हा अर्धा तास जोरदार पाऊस झाला.

सायंकाळी साडेसहापासून पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंग केली. दिवसभरात चार तास जोरदार पाऊस झाला. येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली देखील पाणी साचले होते. शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. शिवाय जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पाऊस झाला.

लोहा (िज.नांदेड) तालुक्यातील पिंपळदरी शिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. येथील शेतकरी मोहन संभाजी जाधव यांचा एक बैल वीज पडून दगावला. दुपारी तीनच्या दरम्यान वीज कोसळून ही घटना घडली. कापसी बुद्रुक येथील पोलवर पहाटेच्या सुमारास वीज कोसळली. यामुळे तांत्रिक बिघाड होऊन बुधवारी दिवसभर परिसरातील दहा गावांतील वीजपुरवठा खंडित होता. संभाजीनगरात सखल भागात पाणीच-पाणी झाले होते. वाहनधारकांची यामुळे तारांबळ झाली.

पाच ठार, २९६ हेक्टरवर पिकांचे नुकसान

नांदेड ः मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हातही नांदेड शहर व परिसरात वातावरण बदलाचा अनुभव नागरिक घेत आहेत. दिवसभर रखरखीत ऊन असतानाच रात्रीच्या वेळी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे शहरवासीयांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळत आहे. दरम्यान, अवकाळी पावसात यंदा जिल्ह्यात पाच जण ठार; तर २९६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

तसेच ३६ जनावरे दगावली आहेत. प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील ४५ गावे अवकाळीने बाधित असून सुमारे २९६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत आणखी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. या वातावरण बदलाचा परिणाम आरोग्यावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.