सातारा : येथील जिल्हाधिकारी कार्यालय दुपारी सव्वातीन वाजता आरडीएक्स आयडी लावून उडवून देणार, असा ई-मेल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाल्याने शहरात खळबळ उडाली होती. याचदरम्यान पोलिस छत्रपती शिवाजी महाविद्यालय परिसरात बाँब शोधण्याचे मॉक ड्रील करत होते. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
ई-मेलची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने ॲक्शन घेत मुसळधार पावसातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीसह परिसरातील सर्व इमारती तातडीने रिकाम्या केल्या. त्याचप्रमाणे बाँब डिटेक्शन स्क्वॉड आणि श्वान पथकाच्या मदतीने कसून तपासणी केली. मात्र, या तपासणीत काहीही आढळून आले नाही. हा ई-मेल अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या बाँब शोधक पथकाचे आज छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मॉक ड्रील सुरू होते. यादरम्यानच दुपारी १२.२० च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय सव्वातीनला बाँबने उडवून देणार असल्याबाबत ई-मेल आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलिसांना कळविण्यात आली. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर पोलिसांची यंत्रणा वेगाने हलली. त्यांनी तत्काळ बीडीएस, आरसीपी व श्वान पथकाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला. सातारा शहर, तालुका व बोरगाव पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उपअधीक्षक (मुख्यालय) अतुल सबनीस हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तब्बल १२० कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व परिसर तातडीने बंद करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी व कामानिमित्त आलेल्या नागरिकांना कार्यालयाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बाँब शोधक पथकाने पुनर्वसन कार्यालय, गेस्ट हाऊस, जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत, नियोजन भवन, प्रशासनाची मुख्य इमारत या सर्वच ठिकाणी कसून तपासणी केली. सुमारे तासभर ही तपासणी सुरू होती.