VIDEO: Suryakumar Yadav ने छत्री डोक्यावर धरत घेतला सामनावीर पुरस्कार; मुंबईच्या विजयानंतर पावसाची जोरदार बॅटिंग
esakal May 22, 2025 07:45 PM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत प्लेऑफ गाठणारा मुंबई इंडियन्स चौथा संघ ठरला. मुंबईने बुधवारी (२१ मे) घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स संघाला ५९ धावांनी पराभूत केले. मुंबईच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांची फटकेबाजी आणि जसप्रीत बुमरा- मिचेल सँटनर यांची गोलंदाजी महत्त्वाची ठरली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८० धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली. तसेच रायन रिकल्टन (२५), विल जॅक्स (२१), तिलक वर्मा (२७) आणि नमन धीर (नाबाद २४) यांनी छोटेखानी खेळी केल्या.

दरम्यान १८ व्या षटकापर्यंत मुंबईच्या ५ बाद १३२ धावाच झाल्या होत्या, मात्र सूर्यकुमार आणि नमन यांनी अखेरच्या दोन षटकांत ४८ धावा फटकावल्या. त्याचा मुंबईला फायदा झाला.

त्यानंतर मुंबईने दिल्लीला १८.२ षटकात १२१ धावांवरच रोखले. दिल्लीकडून समीर रिझवीने सर्वाधिक ३९ धावा केल्या. विपराज निगमने २० धावा केल्या. पण याव्यतिरिक्त कोणीही २० धावांटा टप्पा पार करू शकले नाहीत. मुंबईकडून गोलंदाजी करताना मिचेल सँटेनर आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

या सामन्यातील शेवटचा चेंडू पडल्यानंतर मात्र मुंबईत जोरात पावसाला सुरुवात झाली. मुंबईला यापूर्वीच हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे सामन्यावर पावसाचे सावटही होते.

मात्र सामन्यादरम्यान, पावसाची कृपा झाली आणि सामना पूर्ण झाला. पण त्यानंतर जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे सामन्यानंतरचे पुरस्कार वितरण सोहळा भर पावसात घेण्यात आला. यावेळी सर्वजण छत्री घेऊन उभे असल्याचे दिसले. यामध्ये मुंबई इंडियन्सची मालकीण नीता अंबानी यांचाही समावेश होता.

या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिला जाणारा पुरस्कार जिंकला. पण त्याला हा पुरस्कार पावसाच स्वीकारावा लागला. त्याने छत्री धरून पावसात हा पुरस्कार स्वीकारला.

त्यानंतर तो प्रेझेंटेटर हर्षा भोगले यांच्याशी बोलायला गेल्यानंतर त्याने त्यांच्याही डोक्यावर ती छत्री धरल्याचे दिसले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आयपीएलने शेअर केला आहे. त्याचा कॅप्शनमध्ये लिहिलंय की सामन्यानंतरची मुलाखत अशी तुम्ही कधी पाहिलिये का?'

सूर्यकुमार सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर भोगले यांच्याशी बोलताना पत्नीसाठी हा पुरस्कार महत्त्वाचा होता, असं त्याने सांगितले. तसेच त्याने त्याच्या खेळीबद्दलही सांगितले.

तो म्हणाला, 'आत्तापर्यंत १३ सामने झाले. माझ्या पत्नीने मला एक गोड गोष्ट आज सांगितली. तिने सांगितले की सामनावीर पुरस्काराशिवाय तुला सगळे पुरस्कार मिळालेत. हा आजचा पुरस्कार खास आहे. संघाच्यादृष्टीने माझी खेळी महत्त्वाची होती आणि हा पुरस्कार माझ्या पत्नीसाठी महत्त्वाचा होता. ती असे क्षणांची प्रतिश्रा करत असते. आम्ही नक्कीच सेलिब्रेशन करू.'

'एका फलंदाजाने शेवटपर्यंत टिकून राहणे महत्त्वाचे होते. आम्हाला माहित होते की एक षटक १५-२० धावांचे असेल, ज्यासाठी आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली. नमन फलंदाजीला आला आणि त्याच्याकडे ऊर्जा होती. त्यामुळे तो सामन्याला वळण देणारा क्षण ठरला.'

दरम्यान, मुंबईने आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवले असल्याने त्यांच्याकडे ६ व्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी असणार आहे. त्यांनी यापूर्वी २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.