कराची : पाकिस्तानी लष्कराच्या आग्रहाखातर अमलात येत असलेल्या वादग्रस्त कालवा प्रकल्पाविरोधात आज सिंध प्रांतात प्रचंड मोठे आंदोलन होऊन त्याची परिणती हिंसाचारात झाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन आंदोलक ठार झाले, तर आंदोलकांनी प्रांताच्या गृहमंत्र्याच्या घरावर हल्ला करत हे घर पेटवून दिले.
सिंधू नदीवर बांधल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा फायदा पंजाब प्रांतालाच होणार असल्याने सिंध प्रांतातील शेतकऱ्यांचा याला प्रचंड विरोध आहे. मागील महिन्यापासून विरोधाची धार तीव्र होत आहे. लष्करात आणि सत्तेत वर्चस्व असलेल्या पंजाब प्रांताच्या नेत्यांनी सिंधच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष केल्याचा सिंधच्या नागरिकांचा आरोप आहे.
आज आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ‘जिए सिंध मुत्ताहिदा महज’ या पक्षाचा एक कार्यकर्ता ठार झाला. त्यामुळे आंदोलनाला हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त होत आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. तसेच सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लांजर यांच्या घरावर हल्ला करत हे घर पेटवून दिले.
आंदोलकांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या कार्यालयाचीही नासधूस केली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा केलेल्या गोळीबारात आणखी एकाचा मृत्यू झाला, तर २० ते २५ जण जखमी झाले. कराची, फिरोज आणि इतर काही शहरांमध्ये हे आंदोलन झाले. पाक लष्कराने मात्र कालव्याचे खोदकाम सुरू केले आहे.
असा आहे प्रकल्प‘ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव्ह’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कालवा प्रकल्पाचा खर्च ३.३ अब्ज डॉलर इतका आहे. या प्रकल्पामुळे हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
तर, या माध्यमातून सिंधला मिळणारे पाणी पंजाबला वळविण्याचा डाव असल्याचा व यामुळे सिंधमधील शेती धोक्यात येऊन दुष्काळाची स्थिती निर्माण होणार असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. त्यातच भारताने सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती दिल्याने सिंधचे हाल होणार आहेत.
‘पाकचे आरोप खोटे’बलुचिस्तानमध्ये शाळेच्या बसला लक्ष्य करून घडवून आणण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात भारताचा हात असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारत सरकारकडून बुधवारी फेटाळून लावण्यात आला. ‘पाकिस्तानचे आरोप निराधार आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आहेत,’ अशा शब्दांत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला फटकारले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, आज सकाळी खुजदार येथील घटनेत भारताचा सहभाग असल्याबद्दल पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही फेटाळून लावतो. अशा सर्व घटनांमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल भारत शोक व्यक्त करतो. स्वतःचे गंभीर अपयश लपविण्यासाठी, पाकिस्तानने आपल्या सर्व अंतर्गत समस्यांसाठी भारताला दोष देणे हा त्यांचाच स्वभाव बनला आहे.