Jairam Ramesh : शिष्टमंडळ दौऱ्यांवरून काँग्रेस आक्रमक; सरकारवर जनतेचा भ्रम निर्माण करण्याचा आरोप
esakal May 22, 2025 04:45 PM

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात जागतिक स्तरावर संदेश देण्यासाठी जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून विचलीत करण्याचा प्रयत्न आहे, अशी खिल्ली उडवली. तसेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या नावाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळांना पाठविणे हा एक प्रसिद्धी मिळविण्याचा आणि जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. सरकारने आतापर्यंत पहलगाम हल्ल्यावर, तसेच चीन-पाकिस्तानसारख्या गंभीर मुद्द्यांवर अधिवेशन बोलावले नाही. सरकार खरोखर गंभीर असेल तर संसद विशेष अधिवेशन का होत नाही? असा सवालही रमेश यांनी केला.

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष २२ एप्रिलपासून बैठकीची मागणी करत आहेत. दोन बैठकाही झाल्या, पण त्या बैठकीत पंतप्रधान सहभागी झाले नाहीत. त्यानंतर राहुल गांधी आणि खर्गे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून संसद अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती, याकडेही रमेश यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, की पाकिस्तान दहशतवादाला मदत करत आहे आणि त्याचे चीनसोबत धोरणात्मक संबंध आहेत आणि हे मुद्दे संसदेत चर्चा होण्यासारखे होते.

पण सरकारने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आधी जातिनिहाय जनगणना आणि आता हे शिष्टमंडळांच्या परदेश दौऱ्यांचा मुद्दा पुढे केला आहे. राहुल गांधी पाकिस्तानला ऑक्सिजन देत असल्याच्या भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जयराम रमेश यांनी पहलगामच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडा, असे आव्हान दिले. ते म्हणाले, की पाकिस्तानला चीनची फूस आहे हे सर्वविदीत आहे. पाकिस्तान हे सर्व चीनच्या मदतीशिवाय करू शकत नाही. आम्ही चीन आणि पाकिस्तान यांच्या युतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जसवंत सिंह यांनी जिना यांचे कौतुक केले होते. मोदी शरीफ यांच्याकडे गेले होते, असा चिमटाही जयराम रमेश यांनी काढला.

खर्गेंकडून अवमान : भाजप

ऑ परेशन सिंदूरला किरकोळ घटना संबोधत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लष्कराचा अपमान केला, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे नेते भारतविरोधी वक्तव्ये करत पाकिस्तानला ऑक्सिजन देत असल्याचा टोला त्रिवेदी यांनी मारला.

लष्कराने शौर्य आणि पराक्रम दाखवत ऑपरेशन सिंदूर यशस्वी करुन दाखवले. दुसरीकडे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते ही किरकोळ घटना असल्याचे सांगत आहेत. हा केवळ लष्कराचा नव्हे तर देशातील तमाम नागरिकांच्या भावनांचा अपमान आहे. याआधी राहुल गांधी यांनी देखील आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. कॉंग्रेसच्या नेत्यांची विधाने ही आकस्मिक नाहीत तर विचारपूर्वकतेने करण्यात आली आहेत. पाकिस्तानला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. ‘इंडिया’ आघाडी असे नाव दिल्याने कोणी इंडियन होत नाही, हे काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, असेही त्रिवेदी म्हणाले.

हिंदूंना शोधून लक्ष्य

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे हिंदूंना शोधून लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप सुधांशू त्रिवेदी यांनी केला. मुर्शिदाबाद हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाने तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने अलीकडेच अहवाल सुपूर्द केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने तृणमूल काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

तृणमूल काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीच्या चेहऱ्यावरील धर्मनिरपेक्षतेचा बुरखा गळून पडला असल्याचे सांगत त्रिवेदी म्हणाले की, पाकविरोधात युद्ध करण्याची काय गरज आहे, केवळ दहशतवाद्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे सांगणारे लोक हिंदूंविरोधात हिंसाचार व्हावयास नको, असे का बोलत नाहीत. मुर्शिदाबादच्या हिंसाचारात बाहेरचे लोक सामील असल्याचा दावा तृणमूल नेत्यांनी केला होता. मात्र अहवालात एका स्थानिक आमदाराचे नाव समोर आले आहे. महबूब आलम नावाच्या आमदाराच्या  निर्देशावरुन हिंसाचार घडवण्यात आला, असे अहवालात म्हटले आहे.

दोन शिष्टमंडळे रवाना

भारताविरोधात कायम दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱ्या पाकिस्तानचा भंडाफोड करण्यासाठी खासदारांची दोन शिष्टमंडळे बुधवारी रात्री रवाना झाली. संयुक्त जनता दलाचे खासदार संजयकुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पूर्वेकडील जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया व सिंगापूर या देशांना भेटी देणार आहे. तर, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती, लायबेरिया, कांगो, सिएरा लिओन या देशांना भेटी देणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.