Sanjay Rathod : सध्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. कारण आता महायुतीचाच घटकपक्ष असलेल्या भाजपा या पक्षाचे आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असा गंभीर स्वरुपाचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे महायुतीचाच भाग असलेल्या भाजपाच्या आमदाराने हा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचं पत्रही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
मृद व जलसंधारण खात्यात पैसे घेऊन नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर संदीप जोशी यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली आहे. आठ अधिकाऱ्यांची बेकायदा नेमणूक केल्याचाही आरोप संदीप जोशी यांनी केला आहे. 375 उपविभाग जलसंधारण अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे, असा आरोपही संदीप जोशी यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पैशांचा व्यवहार 100 टक्के झाला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जेव्हा शासकीय निर्णय स्पष्ट असतात तेव्हा कुठलातरी मार्ग काढून स्वत:च्या बदल्या करून घेण्याचं काम अधिकारी करतात, असा दावा संदीप जोशी यांनी केला आहे. तसेच यावर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.