कॅलिफोर्नियाजवळ लहान विमान रहिवाशी भागात कोसळलं, अनेकांचा मृत्यू; कार जळून खाक
esakal May 23, 2025 05:45 AM

कॅलिफोर्नियाजवळ सॅन डिएगो इथं रहिवाशी भागात विमान कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. सॅन डिएगो शहरात गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. एक खासगी विमान रहिवाशी भागात कोसळून काही घरांना आग लागलीय. याशिवाय अनेक गाड्याही जळून खाक झाल्या आहेत. दुर्घटनेत विमानातील अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय.

सॅन डिएगो अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दुर्घटनेनंतर विमानातील जेट इंधन रस्त्यांवर सांडलं. यानंतर त्या इंधनाला आग लागली आणि ही आग परिसरात उभा असलेल्या गाड्यांना लागली. यात अनेक कार जळून खाक झाल्या असून मोठं नुकसान झालं आहे.

विमान दुर्घटनेत रहिवाशी भागातल्या घरांमधील किंवा रस्त्यांवरील कोणाचा मृत्यू झाला नसल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. हा अपघात कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार हे विमान वीजेच्या तारांना धडकल्यानं दुर्घटना घडली असावी.

कोसळलेलं विमान हे खासगी होतं आणि ८ ते १० प्रवासी क्षमतेचं होतं. पण अपघातावेळी विमानातून किती जण प्रवास करत होते याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मृतांचा नेमका आकडाही समजू शखलेला नाही.

विमान सॅन डिएगोतील मोंटगोमेरि गिब्स एक्झिक्युटीव्ह विमानतळावर उतरणार होते. त्याआधीच पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडली. सेसना साटेशन २ प्राकरचं जेट विमान कर्नल जेम्स जबारा या विमानतळावरून आल्याची माहिती देण्यात आलीय.

विमान दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य वेगानं सुरू आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचा तपास केला जात आहे. दरम्यान, दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.