वॉशिंग्टन : इस्राईल- पॅलेस्टाइन वादाचे पडसाद आज अमेरिकेतही उमटले. वॉशिंग्टनमधील इस्राईलच्या दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांवर एका हल्लेखोराने आज गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही ठार झाले.
पोलिसांनी या हल्लेखोराला अटक केली, त्यावेळी तो ‘पॅलेस्टाइन मुक्त करा’ अशी घोषणा देत होता. या घटनेमुळे धक्का बसल्याची प्रतिक्रिया इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली आहे.
यारोन लिशिन्स्की आणि सारा मिलग्रिम अशी मृत्युमुखी पडलेल्या इस्रायली कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यापैकी लिशिन्स्की हे दूतावासात संशोधन सहायक म्हणून काम करत होते, तर मिलग्रिम या इस्राईल दौऱ्यांचे आयोजन करायच्या. त्या अमेरिकी नागरिक होत्या, तर लिशिन्स्की इस्राईलचे नागरिक होते.
येथील एका संग्रहालयातील आयोजित केलेला कार्यक्रम संपवून लिशिन्स्की आणि मिलग्रिम यांच्यासह चौघे जण बाहेर पडत असतानाच हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात दोघा जणांचा मृत्यू झाला. एलियास रॉड्रिग्ज असे हल्लेखोराचे नाव असून गोळ्या मारल्यानंतर तो संग्रहालयात शिरला. तेथे पोलिसांनी त्याला अटक केली. अटक करून घेऊन जात असताना तो पॅलेस्टाइन मुक्त करण्याबाबतच्या घोषणा देत होता.
या हल्ल्यानंतर इस्राईलच्या दूतावासाबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध करताना, द्वेष आणि कट्टरतावाद यांना अमेरिकेत कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनीही हल्ल्याचा निषेध करताना विद्वेष पसरल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले आहे.
मारले गेलेले प्रेमी युगुलगोळीबारात मारले गेलेले यारोन लिशिन्स्की आणि सारा मिलग्रिम या दोघा कर्मचाऱ्यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि ते लवकरच विवाह करणार होते, अशी माहिती इस्राईलच्या राजदूतांनी दिली. लिशिन्स्की यांनी सारा यांच्यासाठी अंगठीही खरेदी केली होती. पुढील आठवड्यात जेरूसलेमला जाऊन ते अधिकृतपणे विवाहाची घोषणा करणार होते. या दोघांना मारणाऱ्या हल्लेखोराला कडक शिक्षा करण्याची ग्वाही अमेरिका सरकारने दिली आहे.