Nanded News – गाडीवर पोलीस व पत्रकार बोर्ड लावून गोवंश चोरी करण्याचा प्रयत्न; सहा जणांना अटक
Marathi May 23, 2025 08:25 PM

नांदेड जिल्ह्यातील देगलूर व बिलोली पोलिसांनी मिळून पत्रकार व पोलीस नावाचे बोर्ड इनोव्हा वाहनावर लावून गोवंश चोरी करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य टोळीच्या सहा आरोपींना वाहनासह ताब्यात घेवून त्यांना अटक केली आहे. यातील काही आरोपी मुंबईमधील आहेत.

गोवंश चोरी करणे व त्यांची कत्तल करणे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी हे सर्व प्रकार घडत असल्याचे अनेकांनी पोलीस अधीक्षकांना सांगितले होते. देगलूर व बिलोली पोलीस ठाण्याचे पथक गुरुवारी (22 मे 2025) रात्री गस्तीवर असताना एका वाहनास त्यांनी थांबवले. देगलूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारोती मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक अश्रूदेव पवार, पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड यांनी गाडीमध्ये बसलेल्या आरोपींची कसून चौकशी केली. हे सर्व आरोपी गोवंश चोरी करण्याच्यादृष्टीने फिरत असल्याचे आढळून आले. यापूर्वी त्यांनी या प्रकारचे गुन्हे केले असल्याचे त्यांनी कबूल केले आहे.

आरोपींची नावे प्रामुख्याने सय्यद अमीर सय्यद अन्वर अली, सय्यद उमर सय्यद फारुख, अब्दुल कलाम अब्दुल सलाम, सय्यद सोएब सय्यद फारुख सर्व नांदेड आणि महेबूब पाशा शेख व समीर अनिस कपरेशी दोघेही कुर्ला आणि कल्याण येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी पकडलेल्या गाडीवर एका बाजूला पोलीस आणि एका बाजूला पत्रकार असे बोर्ड लावण्यात आले होते. पोलीस आणि पत्रकार असे वेगवेगळे बोर्ड लावण्यात आल्याने पोलिसांना याबाबतचा संशय आला. त्यावरुन त्यांनी या सर्व आरोपींची चौकशी केली. तेव्हा गोवंश चोरीसाठी आम्ही फिरत असल्याचे त्यांनी सांगून यापूर्वी देखील अनेक ठिकाणी गोवंश चोर्‍या केल्याचे त्यांनी कबुल केले. शुक्रवारी (23 मे 2025) सर्वांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.