RCB vs SRH : आरसीबीला मोठा झटका, हैदराबादने नंबर 1 होण्यापासून रोखलं, ऑरेंज आर्मीचा 42 धावांनी विजय
GH News May 24, 2025 03:05 AM

सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 42 धावांनी मात केली आहे. हैदराबादने आरसीबीला विजयासाठी 232 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी आरसीबीला 19.5 ओव्हरमध्ये 189 धावांवर गुंडाळलं. हैदराबादचा हा या हंगामातील पाचवा विजय ठरला. हैदराबादने या विजयासह आरसीबीच्या अडचणीत वाढ केलीय. प्लेऑफमध्ये पोहचलेल्या आरसीबीला या सामन्यात विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचण्याची संधी होती. मात्र हैदराबादने आरसीबीला नंबर 1 होण्यापासून रोखलं. इतकंच नाही, तर आरसीबीला या पराभवामुळे नेट रनरेटमध्येही फटका बसला आहे. आरसीबीची पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच नेट रनरेटमध्येही फटका बसला आहे. आरसीबीचा नेट रनरेट हा सामन्यआधी +0.482 असा होता. तोच नेट रनरेट पराभवानंतर +0.255 असा झाला.

आरसीबीची विजयी धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात झाली. फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली या सलामी जोडीने 80 धावांची भागीदारी केली. विराटला चांगली सुरुवात मिळाली. विराटला मोठी खेळी करण्याची संधी होती.मात्र हर्ष दुबे याने हैदराबादसाठी डोकेदुखी ठरत असलेली ही सलामी जोडी फोडली. हर्षने विराटला आऊट केलं. विराटने 25 बॉलमध्ये 43 रन्स केल्या.

त्यानंतर मयंक अग्रवाल आणि सॉल्ट या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 40 धावा जोडल्या. मंयक अग्रवाल आरसीबीच्या 120 धावा असताना आऊट झाला. मंयकने 11 रन्स केल्या. मयंकनंतर फिल सॉल्ट हा देखील आऊट झाला. सॉल्ट 5 सिक्स आणि 4 फोरसह 32 बॉलमध्ये 62 रन्स केल्या. त्यामुळे आरसीबीचा स्कोअर 3 आऊट 129 असा झाला. त्यानंतर रजत पाटीदार आणि कॅप्टन जितेश शर्मा या दोघांनी काही वेळ मैदानात घालवला. त्यामुळे आरसीबीला विजयाची आशा होती. मात्र ही जोडी फुटली आणि आरसीबी घसरगुंडी सुरु झाली. रजत पाटीदार 18 रन्सवर आऊट झाला.

त्यानंतर जितेश शर्मा याचा अपवाद वगळता 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. जितेशने 15 बॉलमध्ये 24 रन्स केल्या. तर कृणाल पंड्या 8, भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल या दोघांनी प्रत्येकी 3 -3 धावा केल्या. टीम डेव्हीडकडून खूप आशा होत्या. मात्र त्याला दुखापतीमुळे काहीच करता आलं नाही. डेव्हिडने 1 धाव केली. तर रोमरियो शेफर्ड याला भोपळाही फोडता आला नाही. हैदराबादसाठी कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ईशान मलिंगा याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. तर जयदेव उनाडकट, हर्षल पटेल, हर्ष दुबे आणि नितीश कुमार रेड्डी या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

पहिल्या डावात काय झालं?

दरम्यान त्याआधी आरसीबी कर्णधार जितेश शर्मा याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि सनरायजर्स हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 231 धावा केल्या. हैदराबादसाठी ईशान किशन याने सर्वाधिक 94 धावांचं योगदान दिलं. ईशानच्या या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. ओपनर अभिषेक शर्मा याने 34 रन्स केल्या. अनिकेत वर्मा याने 26 तर हेन्रिक क्लासेनने 24 धावा केल्या. ट्रेव्हिस हेडने 17 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. नितीश रेड्डीने 4 धावांचं योगदान दिलं. तर अभिनव मनोहर आणि पॅट कमिन्स जोडी नाबाद परतली. अभिनवने 12 तर पॅटने 13 रन्स केल्या. आरसीबीकडून रोमरियो शेफर्डने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, लुंगी एन्गिडी, सुयश शर्मा आणि कृणाल पंड्या या चौकडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.