सासरच्यांकडून टोकाचा मानसिक त्रास, परभणीत 21 वर्षीय महिलेनं संपवलं जीवन, 6 जणांवर गुन्हा दाखल
Marathi May 23, 2025 08:25 PM

परभणी : पुण्यातील वैष्णवीचे प्रकरण ताजे असतानाच परभणीतही एका 21 वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. परभणीच्या झरीतील घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात साक्षीच्या पती, सासू सासरे यांच्यासह एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्वांना अटक करण्यात आली आहे. शिवाय या 6 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

परभणीच्या झरी गावातील साक्षी हिचा विवाह 12 डिसेंबर 2022 रोजी गावातीलच एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या चंद्रप्रकाश लाटे यांच्याबरोबर झाला होता. लग्न झाल्यानंतर 4 ते 5दिवसांनंतर साक्षीला तिच्या सासू प्रमिला लाटे, सासरे भिकुदास लाटे यांनी मानसिक त्रास द्यायला सुरू केला. तुला स्वयपाक चांगला येत नाही, कोणतेही काम तू नीट करत नाही असे म्हणुन सारखे छोट्या मोठ्या गोष्टींवरुन त्रास देणे सुरू केले. तसेच नवरा चंद्रप्रकाश हा ही दारु पिऊन आई वडिलांचे ऐकूण साक्षीला त्रास देत होता. तसेच मारहाण करत होता. शिवाय तिच्या आई वडिलांना फोनवर बोलूही देत नव्हता. यामुळं कंटाळून लग्नाच्या महिनाभरातच साक्षी ही माहेरी आली त्यांनतर साक्षीने पती पत्नीत समेट घडवी यासाठी भरोसा सेलकडे अर्ज दिला होता. मात्र, त्याच्याशी उलटच परिणाम झाला. तिला पुन्हा तू पोलिसांकडे का गेली असे म्हणत जास्त त्रास देणे सुरू झाले. महत्वाचे म्हणजे मी एमपीएससी करतो मला नोकरी लागणार आहे. मी तुला घेवून जाणार आहे असे म्हणत तिचा मानसिक छळ करत होता.

दरम्यान, साक्षीच्या वडिलांनी साक्षीला नांदायला घेऊन जावं यासाठी गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेतही त्यांच्या कुटुंबीयांची समेट घडवण्यासाठी भेट घेतली होती. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. या बैठकीनंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ केली. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साक्षीचे तिच्या पतीबरोबर फोनवर बोलणे झाले आणि तिने घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन साडीने गळफास घेवून आत्महत्या केली.

6 जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल

मृत साक्षीचे वडील बाबाराव ननवरे यांच्या फिर्यादीवरुन परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये साक्षीचा पती चंद्रप्रकाश लाटे तसेच सासरा भिकुदास लाटे सासू प्रमिला लाटे, भाया दैवत लाटे, जाऊ सुजाता दैवत लाटे नणंद दयावंती या 6 जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.