जो रुटचा कारनामा, सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड ब्रेक, आता वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर
GH News May 23, 2025 09:09 PM

टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी इंग्लंड विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात 4 दिवसीय कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी दिग्गज फलंदाज आणि जो रुट याने इतिहास घडवला आहे. जो रुट याने माजी दिग्गज फलंदाज जॅक कॅलिससह सचिन तेंडुलकर या सर्वांना एका झटक्यात मागे टाकलं आहे. आता जो रुटच्या निशाण्यावर सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. जो रुट गेल्या काही वर्षांपासून सातत्याने धावा करतोय. रुट या वेगानेच धावा करत राहिला तर सचिनचा वर्ल्ड रेकॉर्डही काही महिन्यांत ब्रेक होईल.

जो रुट याने झिंबाब्वे विरुद्ध पहिल्या डावात 44 बॉलमध्ये 3 फोरसह 34 रन्स केल्या. रुटने या खेळी दरम्यान 28 वी धाव घेताच इतिहास घडवला. रुटने यासह कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पार केला. रुट 13 हजार धावा करणारा इंग्लंडचा पहिला एकूण पाचवा फलंदाज ठरला. विशेष म्हणजे रुटने सर्वात वेगवान 13 हजार कसोटी धावा करण्याचा जॅक कॅलिसचा रेकॉर्ड ब्रेक केला. जॅक कॅलिसने 159 व्या सामन्यात ही कामगिरी केली होती. तसेच आता सचिन तेंडुलकर याचा सर्वाधिक कसोटी धावांचा वर्ल्ड रेकॉर्डही धोक्यात आहे. सचिनने कसोटीत 15 हजार 921 रन्स केल्या आहेत.

कसोटीत 13 हजार धावा करणारे फलंदाज

जो रुट , 153 सामने

जॅक कॅलिस, 159 सामने

राहुल द्रविड, 160 सामने

रिकी पाँटिंग, 162 सामने

सचिन तेंडुलकर, 163 सामने

जो रुटची कसोटी कारकीर्द

जो रुट याने 22 डिसेंबर 2012 रोजी टीम इंडिया विरुद्ध नागपूरमध्ये कसोटी पदार्पण केलं होंत. रुटने तेव्हापासून आतापर्यंत एकूण 153 सामन्यांमधील 279 डावांमध्ये 50.8 च्या सरासरीने 13 हजार धावा केल्या आहेत. रुटने या दरम्यान 6 द्विशतकं, 36 शतकं आणि 65 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच कसोटीत सर्वाधिक धावा करणारा रुट पहिला सक्रीय फलंदाजही आहे.

इंग्लंड 500 पार

दरम्यान इंग्लंडने झिंबाब्वे विरुद्ध दुसऱ्या दिवशी 500 पार मजल मारली आहे. इंग्लंडसाठी टॉप 3 फलंदाजांनी शतकी खेळी केली. झॅक क्रॉली, बेन डकेट आणि ओली पोप या त्रिकुटाने शतकं झळकावली. ओली पोर याने 166 बॉलमध्ये 171 रन्स केल्या. बेन डकेटने 140 धावा केल्या. तर झॅक क्रॉलीने 124 धावांचं योगदान दिलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.