नागपूर : एनआयटी गार्डनमध्ये कुत्र्यासह फिरायला गेलेल्या ४५ वर्षीय महिला आणि तिच्या श्वानाचा विद्युत खांबातून शाॅक लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना सुभेदार येथील एनआयटी गार्डनमध्ये बुधवारी (ता.२१) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
शितल श्याम काळे (रा. गजानन मंदिर परिसर, जुना सुभेदार) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या घरी मेस व डेली निड्सचे दुकान चालवित होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री त्या आपल्या कुत्र्यासह गार्डनमध्ये आल्या. तेव्हा हलक्या पावसाच्या सरी येत होत्या.
श्वानाला खेळण्यासाठी सोडल्यावर त्या बसल्या. दरम्यान श्वान विजेच्या खांबाजवळ आला. त्याला शाॅक लागल्याने तो तेथेच राहीला. दरम्यान कुत्र्याला नेण्यासाठी त्या तिथे आल्यात त्यांनी कुत्र्याच्या गळ्यात असलेली लोखंडी साखळी पकडताच, त्यांनाही विजेचा धक्का बसला. त्यामुळे त्याही बेशुद्ध पडल्या. काही वेळाने त्यांचे पती तिथे आले.
त्यांनी बॅटने त्यांना वेगळे करीत मेडिकलमध्ये नेले. डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांना मिळालेल्या सुूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.